मुंबई, दि. ६ : दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजना थेट दिव्यांगांच्या दारी पोहचविण्यासाठी शासन स्तरावरून दिव्यांग कल्याण विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाचा उद्या बुधवार दिनांक ७ जून २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे.
या कार्यक्रमास सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक (मंत्री दर्जा) आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार श्रीमती विद्या ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
दिव्यागांचे शिबीर दिनांक ७ जून २०२३ बुधवार रोजी, वेळ सकाळी १०:०० ते ०३:०० स्थळ:- हॉल क्र. ५, नेस्को एक्झीबीशन अॅण्ड ट्रेड सेंटर, गोरेगांव (पूर्व) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालये, विविध महामंडळे व इतर संस्था यांच्याकडून दिव्यांगांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, रोजगार नोंदणी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्याकरीता त्यांच्या मागण्या घेऊन त्यांच्या सोयीकरिता उपकरणे व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत व त्या मागण्यांची नोंद करुन घेण्यात येणार आहे. दिव्यांगांनी सोबत येताना दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी (UDID) कार्ड व आधार कार्ड घेऊन यावे, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.
****
शैलजा पाटील/विसंअ/