शेगाव- लोणार विकास आराखड्यातील कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 7 : शेगाव व लोणार विकास आराखड्यातील कामे कालमर्यादेत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करावीत. कामांच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी सादर करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.

शेगाव व लोणार विकास आराखडा, तसेच विविध विषयांचा आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकांद्वारे आज घेतला. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, अर्थ व सांख्यिकी उपसंचालक सुशील आग्रेकर, आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच शेगाव संस्थेचे पदाधिकारी दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की,  श्री संत गजानन महाराजांचे शेगाव व उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर ही दोन्ही स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत. या पर्यटनस्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी आराखड्यातील सर्व नागरी सुविधांची व स्थापत्य बांधकामासाठी कार्यान्वयन यंत्रणांना निधी वितरीत करण्यात आला आहे. ही कामे गतीने, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन’ करा

कार्यान्वयन यंत्रणांनी कामांची प्रगती व सद्य:स्थिती अहवाल वेळोवेळी समितीला सादर करावा. कामांची गुणवत्ता व दर्जा हा ‘थर्ड पार्टी’कडून तपासून उपयोगिता प्रमाणपत्र व कार्यपूर्ती अहवाल सादर करावा. शेगाव येथील हॉकर्स झोनचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी मंदिर प्रशासन व नगर परिषदेने समन्वयाने तोडगा काढावा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

लोणार विकास आराखड्याच्या कार्यान्वयन यंत्रणांत नगर परिषद, वनविभाग, एमटीडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व भारतीय पुरातत्व विभाग आदींचा समावेश आहे. लोणार सरोवर परिसरात पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, निवारा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उर्वरित कामे येत्या 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावी. विद्यापीठाकडून उभारण्यात येणाऱ्या लोणार विज्ञान केंद्र व संशोधन प्रयोगशाळेचे काम वेळेत पूर्ण व्हावे जेणेकरून संशोधनाला चालना द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

 शेगाव विकास आराखड्यात ४२९ कोटी ५६ लाख रू. निधीतून व लोणार विकास आराखड्यात ३६९ कोटी ७८ लाख रू. निधीतून कामांना चालना देण्यात आली आहे, अशी माहिती श्री. चौधरी यांनी सादरीकरणाद्वारे दिली. आराखड्यातील अपूर्णावस्थेतील कामे तत्काळ पूर्ण करावी. दोन्ही स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी दिले.

0000