मुंबईत सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषदेचे आयोजन; विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मेक्सिकोच्या वाणिज्य दूतांबरोबर चर्चा

0
11

मुंबई, दि. ९ : भारत आणि मेक्सिकोच्या पुढाकाराने सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबई येथे आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषद होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मेक्सिकोचे महावाणिज्य दूत ॲडॉल्फ गार्सिया एस्ट्राडा यांच्यात या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या रुपरेषेवर आज प्रारंभिक चर्चा झाली.

मेक्सिकोचे महावाणिज्य दूत श्री. एस्ट्राडा यांनी आज दुपारी विधानभवनात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची भेट घेवून परिषदेबाबत सविस्तर चर्चा केली. या परिषदेत भारतासह मेक्सिको,कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, स्पेन या देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, या परिषदेचे सूक्ष्म नियोजन करण्यात येईल. त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. या परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, विधीमंडळाचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी तसेच  महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य, सामाजिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था, स्त्री आधार केंद्रांच्या पदाधिकाऱ्यांसह राज्याच्या विविध भागातून प्रतिनिधी सहभागी होतील.

या परिषदेत महिलांच्या सुरक्षेवर प्रामुख्याने चर्चा होईल. त्यात महिलांची कौटुंबिक आणि सार्वजनिक सुरक्षा, मानवी हक्क आणि महिला, अवैध मानवी वाहतूक, महिलांवरील हिंसाचाराला प्रतिबंध,  महिला विकासासाठी नावीण्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे आदी विषयांचा समावेश असेल. जपानमध्ये महिलांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये दोष सिद्धीचे प्रमाण ९९ टक्के आहे. या पार्श्वभूमीवर जपानच्या राजदूतांनाही या परिषदेत निमंत्रित करून त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न होणार आहे, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. मेक्सिकोचे वाणिज्यदूत श्री. एस्ट्राडा यांनी स्थलांतरीत होणाऱ्या महिलांचे प्रश्न, मेक्सिकोचे महिला केंद्रीत परराष्ट्र धोरण याविषयीची माहिती दिली.

०००००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here