बाल कामगारविरोधी लढा समाजाने तीव्र करावा – बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह

मुंबई, दि, 12 :- “बालकांना कामावर ठेवणे हा गुन्हा असून, नागरिकांनी पुढाकार घेऊन याला विरोध केला पाहिजे व मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. सोसायटी आणि हॉटेल मालकांनी बाल कामगारांना कामावर ठेवू नये”, असे आवाहन बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी केले.

आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनानिमित्ताने बैठकीचे आयोजन ॲड. सुशीबेन शाह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.  त्यात ॲड. शाह बोलत होत्या. यावेळी  सेवाभावी संस्था व बाल कामगार विरोधात काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी आपली मते मांडून बाल कामगार विरोधी लढा अजून तीव्र करण्यासंबंधी उपाय सुचविले.

ॲड. शाह म्हणाल्या, “14 वर्षांवरील मुलांना शिक्षण मिळण्याची सोय व्हावी व कामाच्या ठिकाणी बालस्नेही वातावरण असावे, यासाठी मालकांनी प्रयत्न करावे.” तसेच ज्या विभागात बाल मजुरी नसेल किंवा कमी प्रमाणात असेल त्या विभगाचा गुणगौरव करण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला. बाल मजुरी रोखण्यासाठी बाल हक्क आयोग व कामगार विभाग एकत्रित प्रयत्न करत राहतील, असे देखील यावेळेस सांगण्यात आले. याच कार्यक्रमांतर्गत या मोहिमेत लोक सहभाग समाविष्ट करून घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीमची सुरुवात कामगार आयुक्तालय कामगार भवन येथे करण्यात आली.

यावेळेस बेहराम पाडा, वांद्रे येथे जन जागृती रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत जन जागृतीसाठी नागरिकांना पत्रक वाटण्यात आली व वाहनांवर स्टिकर लावण्यात आले.ॲड. शाह यांनी हिरवा झेंडा दाखवून जन जागृतीसाठी LED व्हॅन चे उद्घाटन केले.

या कार्यक्रमास कामगार आयुक्त सतीश देशमुख, अपर कामगार आयुक्त शिरिन लोखंडे, बाल हक्क आयोगाच्या सदस्या ॲड. निलिमा चव्हाण यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

००००

संध्या गरवारे/विसंअ