महिलांनाही रोजगार देण्याची शासची भूमिका – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी दि 12( जिमाका) : तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देत असताना महिलांनाही रोजगार देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक ते सर्व आपण करु अशी ग्वाही त्यांनी दिली.

पालकमंत्री उदय सामंत यांनी झरेवाडी आणि वेळवंड येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. झरेवाडी येथे हातखंबा- झरेवाडी- उमरे रस्ता डांबरीकरण (1.5 कि.मी रस्ता) या कामाचे उद्घाटन आणि जि.प. प्राथमिक शाळा झरेवाडी येथे दोन वर्ग खोली इमारत बांधकाम करणे या कामाचे भूमिपुजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी तहसिलदार श्री म्हात्रे, गटविकास अधिकारी श्री जाधव’, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू महाप, सरपंच ऋतुजा गोताड, उपसरपंच देवेंद्र सनगरे, आप्पा कांबळे, तुषार साळवी, राजेश कळंबटे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, गावातील विकास कामे आपण एकत्रित करणे आवश्यक आहे. येथील विकास कामांना निधी उपलब्ध करुन देणे ही आपली जबाबदारी आहे. कोणतेही विकास काम निधी अभावी प्रलंबित राहणार नाही याची मी ग्वाही देतो. श्री वाघजाई रंगमंच झरेवाडी याच्या सुशोभिकरणासाठी आमदार निधीतून 10 लाख रुपये देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच महामार्ग झरेवाडी फाटा ते उमरे पर्यंतच्या 6.5 कि.मी. च्या रस्त्यासाठी 5 कोटी 50 लाख रुपये मंजूर केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

झरेवाडी नंतर त्यांनी वेळवंड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. गावाला दिशा देण्यासाठी, विकास काम करताना येथील तरुणांनी पुढे यावे. डिसेंबरपर्यंत वेळवंडकडे येणारे रस्त्यांची कामे पूर्ण होती असे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000