भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे गरजेचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
10

मुंबई, दि. 13 : गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनी बी प्रा. लि. यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मनि बी प्रा. लि. च्या संचालक शिवानी दाणी वखरे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य व्यवस्थापक श्रीराम कृष्णन, संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनि बी प्रा. लि.संस्था यांच्यासोबत आज सामंजस्य करार करण्यात आला आहे. आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे. या अभियानातून लाखो लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य आहे, सायबर फसवणुकीपासून संरक्षण, पोंझी योजनांबद्दल जागरूकता आणि गुंतवणूक कशी आणि कुठे करायची यांचे मार्गदर्शन होणार आहे. ह्या पुढाकारासाठी मनि बी संस्था आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे  मी अभिनंदन करतो.”

“भांडवली बाजारातील गुंतवणूकीचे विविध पैलू आणि सुरक्षितता याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि गुंतवणुकदारांना व्यावहारिक ज्ञान, योग्य माहिती मिळावी यासाठी राज्यभरात आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येणार आहे”, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान म्हणाले, “महाराष्ट्र सरकार आणि मनी बी संस्था यांच्यासोबत करार करून गुंतवणुकदार यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी आर्थिक साक्षरता अभियान राबवून गुंतवणुकदारांना याबाबतची अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती देतील. शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी, आर्थिक गुंतवणुकीची कशी खबरदारी घ्यावी आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शिवानी दाणी वखरे म्हणाल्या, “आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी भांडवली बाजार महत्त्वाची भूमिका बजावतात. नवीन, संभाव्य आणि विद्यमान गुंतवणुकदारांसाठी सिक्युरिटीज मार्केटमध्ये शिक्षण आणि जागरूकता वाढवणे आणि त्याची सुरक्षितता याबाबत आवश्यक ज्ञान महत्त्वाचे आहे. म्हणून  राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनी बी प्रा. लि. यांच्यामार्फत राज्यात आर्थिक साक्षरता विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून हा आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असणार आहे.”

००००

श्रीमती काशिबाई थोरात/वि.स.अ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here