आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार

मुंबई, दि. १५ – आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने आज जारी केले आहेत, या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत.

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारतीने काढले होते. या आदेशाविरुद्ध सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या अपर मुख्य सचिवांना सूचना देऊन केंद्रातील अधिकाऱ्यांकडे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरू ठेवावा, अशी विनंती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामागणीवर सकारात्मक निर्णय घेत प्रसारभारतीने यापुढे पुणे प्रादेशिक वृत्त विभागातूनच बातमीपत्र प्रसारित होतील, असे आदेश आज काढले आहेत.

सकाळी ७.१०, ८ वा. ८.३०, १०.५८, ११.५८ आणि  सायंकाळी ६ वाजताचे बातमीपत्र यापुढेही पुणे केंद्रावरुनच प्रसारित होणार आहेत.