मुंबई, दि. २१ :- राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, आयुष,आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द व होमिओपॅथी चिकित्सापद्धत अशा सर्व महाविद्यालयांत डॉक्टर, रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित योग करण्यासाठी योग केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याठिकाणी तज्ञ योग प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीष महाजन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने केली.
नॅशनल स्पोर्टस् क्लब, वरळी येथील डोम सभागृह येथे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘वसुधैव कुटुंबकम् साठी योग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, आयुक्त राजीव निवतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री श्री महाजन म्हणाले, “आजच्या या धावपळीच्या जीवनात माणूस आरोग्यापासून लांब होत चालला आहे. कोरोना सारख्या महामारीने आपल्याला चांगलाच धडा शिकवला आहे की आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. त्यामुळे आपले शरीर निरोगी असणे महत्त्वाचे आहे. योगाभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहित व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा या हेतूने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जात आहे”, असे त्यांनी सांगितले.
“योगासन म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर हे आपले शरीर आणि मन दोन्ही जोडण्याचे साधन आहे. उत्तम आरोग्य तसेच शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तणावमुक्त जगण्याबरोबरच तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो”. असे श्री. महाजन यांनी सांगितले.
कैवल्यधाम संस्थेच्या योग मार्गदर्शकांनी उपस्थित मान्यवर आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेतली. तसेच पोतदार वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीत योगाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक विभागाच्या सचिव अश्विनी जोशी यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे महत्त्व सांगून २०२३ ची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम्’ असल्याचे सांगितले. ‘हर घर योगा, हर आंगन योगा’ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे योगाविषयीचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुणाल रेगे यांनी केले. आभार वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांनी मानले.
0000
राजू धोत्रे/विसंअ