महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत महानगरपालिकांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

पुणे, दि. 22: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर आदी महानगरांमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी कार्यगटामध्ये तेथील महानगरपालिका आयुक्तांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मतदार नोंदणी तसेच मतदार यादी शुद्धीकरणासाठी चांगला लाभ होईल, असे मत अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केले.

‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- 2024 व इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी)’ या विषयावर यशदा येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेतील सत्रात मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. देशपांडे म्हणाले, मोठ्या शहरातील मतदानाबाबतची उदासीनता कमी करण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोग गंभीर आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना या प्रक्रियेत सहभागी करुन घेतल्यास प्रभावी काम होईल. संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत मतदार यादी शुद्धीकरण करत असताना कोणतेही शंकेला वाव राहू नये यासाठी प्रारूप मतदार याद्यांमधील नावे वगळणी, नवीन नावे समाविष्ट करणे आदीसंबंधाने हरकतीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रकरणी योग्य कार्यपद्धतीने नोटीस देणे आणि त्यानंतर सुनावणी घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात यावा, असेही ते म्हणाले.

श्री. देशपांडे पुढे म्हणाले, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) संख्या कमी असलेल्या शहरी मतदार संघात बीएलओ नेमणुकीसाठी नागरी स्वराज्य संस्थासोबत समन्वयाने काम करावे. प्रत्यक्ष निवडणुक कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता असलेल्या मतदारसंघासाठी नागरी स्वराज्य संस्था, केंद्रीय कार्यालये आदी कडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याबाबत पर्याय तपासून काम करावे.

आगामी निवडणूक वर्ष पाहता निवडणूक कामकाजासाठी आवश्यक बाबींची खरेदी, भाड्याने साधनसामग्री, सेवा घेणे आदी कामकाज वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे जेणेकरून ऐनवेळी अडचणी उद्भवणार नाहीत. त्यासाठी राज्यभरातील जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आदर्श अशी कार्यपद्धती उपयुक्त व्हावी म्हणून 13 प्रकारच्या ई- निविदांचे नमुने तयार करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले

यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक श्री. अजमेरा म्हणाले, आता होणारे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हे लोकसभा निवडणूक पूर्वी होणारे शेवटचे पुनरिक्षण असल्याने त्याला सर्वाधिक महत्व आहे. मतदार याद्या पूर्णतः शुद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपल्या कामकाजावर भारत निवडणूक आयोगाचे बारकाईने लक्ष असून चांगल्या कामाची दखलही तातडीने घेतली जाते. पुणे जिल्हाधिकारी यांनी मतदार यादी शुद्धीकरण, नव मतदार नोंदणी साठी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट ईलेक्टोरल प्रॅक्टिसेस’ साठी पुरस्कार देत घेतल्याचे दिसून येते, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी पुणे जिल्ह्यात नव युवा मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचा सहभाग घेत एकाच दिवशी 445 हून अधिक महाविद्यालयात विशेष मोहिम राबवून 48 हजार पात्र विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणी अर्ज घेण्यात आले असे सांगितले. असा उपक्रम इतर जिल्ह्यातही राबविण्याबाबत सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी यावेळी केल्या.

यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी श्री. पारकर यांनी निवडणूक आयोगाच्या नवीन सूचना, परिपत्रके यांची, तसेच लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने माहिती दिली. निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळाची नेमणूक, अतिसंवेदनशील (क्रिटिकल) मतदान केंद्रासह एकूणपैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा करणे, मतदान केंद्राच्या आत व परिघाबाहेरील व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेबाबत घ्यायची काळजी आदी अनुषंगाने श्री. पारकर यांनी माहिती दिली. उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहीम कार्यक्रमाची माहिती दिली. सर्व राजकीय पक्षांची बैठक घेणे, बीएलओंनी घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची पडताळणी करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रृटी दूर करणे आदींबाबत माहिती त्यांनी दिली.

यावेळी मुख्य निवडणूक कार्यालयातील स्वीप समन्वयक पल्लवी जाधव यांनी स्वीप उपक्रमाबाबत सादरीकरण करुन माहिती दिली. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आदी समाजमाध्यमांचा मतदारजागृतीसाठी प्रभावी उपयोग कसा करता येईल आदींबाबत माहिती श्रीमती साधना गोरे यांनी दिली. प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार मिलिंद इंगळे यांच्याकडून निवडणूक विभागाचे ब्रँड गीत बनवून घेण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

निवडणूक निविदा समिती अहवाल सादर

यावेळी सोलापूरचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या निवडणूक निविदा समितीने आपला अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांना सादर केला. यावेळी समितीतील सदस्यांचा सत्कार श्री. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.