लातूर म्हटलं की पॅटर्न नजरेत येतो, लातूरने शिक्षण, कृषी पूरक उद्योग त्यातही सोयाबीन उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगात देशात आघाडी घेतली आहे… त्याच तोडीच काम आरोग्यवर्धिनीतून जिल्ह्यात झाले… एवढेच नव्हे तर लातूर जिल्ह्याने आरोग्य सेवेत राज्यातच नव्हे तर देशात प्रथम क्रमांक मिळवला.. जिल्ह्यातील आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ची अंमलबजावणीची तसेच आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांची दखल घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 एप्रिल 2023 रोजी दिल्लीत लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले. आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठीही गेल्या वर्षभरात शासन स्तरावरही प्रयत्न झाले, त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख…!!
लातूर जिल्ह्यातील 233 आरोग्यवर्धिनी केंद्रामधून सातत्याने गुणवत्तापूर्ण सेवा दिली जात आहे. त्यात प्रामुख्याने यामध्ये गरोदर माता बालक, किशोरवयीन मुलींच्या आरोग्यविषयीच्या सेवा, संसर्गजन्य व रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांवरील उपचार, आपत्कालिनी आरोगय सेवा, कान नाक घसा विषयक, मानसिक आजारांवरील सेवा, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योगा, आहार, व्यायाम यासारखे विविध उपक्रम यांचा समावेश आहे. समाजाचे आरोग्य उत्तम राहिले तर प्रगतीचे नवे मार्ग निर्माण होतात, याची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाला असल्यामुळे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु केला. त्याला लातूर जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यातील 10 तालुक्याच्या ठिकाणी हे हॉस्पिटल निर्माण केले असून गोरगरिबांना अगदी रक्त, लघवी तपासणी पासून सर्व सुविधा मोफत असल्यामुळे लोकांचा इकडे वाढता कल आहे. या दवाखान्यामुळे अनेक वर्षे अंगावर काढलेले असंसर्गजन्य रोग कळत आहेत, त्यात प्रामुख्याने उच्च रक्तदाब, थायरॉईड, स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात एनीमिया आढळून येत आहे. अत्यंत गरीब, मध्यमवर्गीयांसाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ संजीवनी ठरत आहे. सर्वसामान्यांना इथल्या मोफत तपासण्या, सुविधा कळतायत तशी गर्दी वाढत चालली आहे, अशी माहिती चाकूर येथील या दवाखान्यातील डॉ. पूजा सूर्यवंशी आणि रेणापूरच्या डॉ. अर्चना मुचाटे यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे हे सातत्याने जिल्ह्यातील सर्व दहाही ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यांच्याशी समन्वय ठेवून असल्यामुळे एक चांगली आरोग्य सुविधा नागरिकांना देता येत असल्याची भावना डॉ. पूजा सूर्यवंशी यांनी बोलून दाखविली.
ग्रामीण आरोग्याचा सेतू आशा सेविका
ग्रामीण आरोग्याचा सर्वात मोठा आधार हा आशा सेविका आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे ग्रामीण भागातल्या शेवटच्या रुग्णापर्यंत आरोग्य सेवा पोहाेचत असते. त्यामुळे आशाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याची भावना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी बोलून दाखविली. लातूर जिल्ह्यात आज घडीला 1 हजार 743 एवढ्या आशा स्वयंसेवक कार्यरत आहेत. शासनाने त्यांना 1 हजार 500 वाढीव मानधन दिले असल्यामुळे आता एक आशा स्वयंसेवकाला जवळपास 5 हजार 500 एवढे मानधन मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्साह अधिक द्विगुणित झाला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगून आरोग्यवर्धिनीच्या कामाला राष्ट्रीय गौरव प्राप्त झाला त्यातही यांचा वाटा अत्यंत महत्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान
लातूर जिल्ह्यात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ 26 सप्टेंबर 2022 पासून राबविण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ह्या अभियानामुळे शेवटच्या वंचीत घटकापर्यंत आरोग्य विभाग पोहाेचला. 150 उपकेंद्र, 50 प्राथमिक आरोग्य केंद्र, 14 ग्रामीण रुग्णालय आणि दोन उप जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय बालस्वासथ्याच्या 30 पथकांच्या माध्यमातून तपासणी घेण्यात आली. त्यातून जिल्ह्यातील 3958 एवढ्या संशयित गर्भाशय मुख कर्करोगाच्या रुग्णांची तर 825 एवढ्या संशयित स्तन कर्करोग रुग्णांची संख्या कळली. त्यामुळे त्यांच्यावर पुढील उपचार करता आल्याची महत्वपूर्ण माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी दिली.
युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर