उपेक्षित, वंचितांचं आयुष्य पालटलं

       जळगाव, दि.27 जून 2023 (जिमाका) – कोणाला रोजगार नव्हता, कोणी शेतमजूरी, मिळेल ते काम करून शिक्षण घेत होतं… कोणाला जन्मतः कर्णदोष होता.. कोणाला हात-पायाचं व्यंग होतं.. अशा उपेक्षित, वंचितांना शासकीय योजनांचा परिसस्पर्श लाभला असून त्याचं आयुष्य पालटून गेलं आहे. ‘शासन आपल्या दारी’ या शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमात शासनाचे हे लाभार्थी जळगाव येथे एका छताखाली जमले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

अगरबत्ती विक्रीतून मिळाले आर्थिक बळ..

            जळगाव मधील पिंप्राळे येथे राहून अगरबत्ती विक्रीतून उदरनिर्वाह करणाऱ्या सागर सुधाकर सुतार याला जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग सक्षमीकरण योजनेमधून तीनचाकी व्हीलचेअर सायकल मिळाली. यामुळे त्याला आता त्याचा अगरबत्ती विक्रीच्या व्यवसाय करण्यास एक नवीन बळ मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया सागर सुतार यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात व्यक्त केली.

श्रवण शक्ती मिळाल्यानं आयुष्य पालटलं…

            साडेपाच वर्षाच्या रूदुराज गांगुर्डेला जन्मत: दोन्ही कानानी ऐकू येत नव्हते. खासगी रुग्णालयात त्याच्या कानाच्या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे सहा लाखापर्यंत होता. त्यांच्या उपचाराची आम्हाला चिंता सतत सतावत होती. मात्र आमच्या मदतीला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाची योजना देवदूतासारखी धावून आली. या योजनेच्या माध्यमातून पुण्याच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये काँक्रिलियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. यामुळे माझ्या रुदुराजला आता चांगलं ऐकू येत आहे. तो हसतखेळत जगत आहे. त्याचं आयुष्य  पालटून गेलं आहे. अशी भावना रुदुराज चे वडील वसंत गांगुर्डे, आई सरिता गांगुर्डे यांनी व्यक्त केली आहे.

स्वाधार योजनेच्या लाभामुळे यशवंतला मिळाली कामापासून सुटका…

            जळगाव मधील एम. जे महाविद्यालयात समाजशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेणारा यशवंत किशोर कुंवर (रा.रायखेड, ता.शहादा, जि.नंदुरबार) हा शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवत होता. त्यामुळे त्याला अभ्यासाला पुरेसा वेळ देता येत नव्हता. अशातच त्याला समाज कल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची माहिती मिळाली आणि योजनेचा लाभ मिळाला. या योजनेत वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. यशवंतला या स्वाधार योजनेतून पहिल्या वर्षी ३८ हजारांची आर्थिक मदत मिळाली यामुळे यशवंतची वेटर कामापासून सुटका झाली असून आता त्याला अभ्यासाला ही पुरेसा वेळ देता येत आहे.

शेतमजूराच्या मुलाचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार…

            वडील लहानपणीच वारले होते. त्यामुळे आई दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करून माझ्या शिक्षणाचा खर्च भागवत होती. मीही पडेल ते काम करून माझं बीकॉम चे शिक्षण पूर्ण केले. जळगावच्या नूतन मराठाच्या महाविद्यालयात एम कॉम शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता. मात्र या पदव्युत्तर पदवी शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा यांची संपूर्ण कुटुंबाला चिंता होती. मात्र समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत ३९ हजार ७०० रूपयांची मदत मिळाल्याने आता माझं एमकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण होणार आहे. अशी प्रतिक्रिया मिलिंद एकनाथ निकम (रा‌. मालेगांव, जि.नाशिक) यांनी दिली आहे.

ट्रॅक्टर मिळाल्याने शेतीची मशागत करणं सहज झालं शक्य..

            जळगाव जिल्ह्यातील लोणखडी येथे लताबाई जुलाल पाटील यांची अडीच एकर बागायती शेती आहे. बागायती शेती करतांना ते बैलजोडी व पारंपरिक अवजारांसह शेती करत होते‌. यामुळे शेतीची मशागत करण्यास फार कष्ट घ्यावे लागत होते. त्यांना कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेतंर्गत कृषि ट्रॅक्टर साठी 1 लाख 25 हजार रुपयांचा  मिळाला. त्यामुळे आता त्या ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करणं सहजशक्य झाले असून त्यांच्या शेतात मका, कापूस पिकांचे उत्पादन घेत आहे. अशी प्रतिक्रिया लताबाई पवार यांनी दिली आहे.

महारोजगार मेळाव्यात योगेशला मिळाली नियुक्ती..

            जळगाव येथील योगेश पाटील यांचे शिक्षण बीएस्सी झाले असून आज जिल्हृयात  शासन आपल्या दारी’ अभियांनातर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज शासन आपल्या दारी याकार्यक्रमातंर्गत नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे आज पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात उपस्थित राहून ॲन्टीमो ब्रेक सिस्टीम्स इ. प्रा. लि. बांभोरी जि.जळगाव या कंपनीत रोजगार मेळाव्यात कागदपत्रे सादर केली. कंपनीने त्याची मुलाखत घेऊन त्वरीत ट्रेनी या पदावर नियुक्ती मिळाल्यामुळे योगेशने शासनाचे आभार मानले आहे.

गिरीषला मिळाला वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ..

            गिरीष किशोर पाटील, जळगाव यांचे शिक्षण एमबीए पर्यंत झाले असून वडील रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने त्यांने व्यवसाय सुरु करण्याचे ठरिवले. यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची त्याला माहिती मिळाली. व त्याने महामंडळाकडे कॅफेटिरीया चालविण्यासाठी कर्ज मंजूरीसाठी प्रकरण सादर केल्यावर त्यांला 5 लाखांचे कर्ज मंजूर झाले. कर्ज मंजूर झाल्यावर त्यांने पहिल्या हप्त्याची नियमित परतफेड केल्यानंतर गिरीषला 5 हजार 500 रुपयाचा व्याज परतावाही महामंडळाकडून मंजूर झाल्याने गिरीषला शासन आपल्या दारी या उपक्रमाचा फायदा झाला असून त्याने शासनाचे आभार मानले आहे.

धनश्रीने केले एमएससीआयटीचे मोफत प्रशिक्षण…

            धनश्री सपकाळे ही जळगाव येथील रहिवासी असून ती टीवायबीए ला शिक्षण घेत आहे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत अनूसूचित जातीच्या लाभधारकांना व्यवसाय तसेच कौशल्य प्राप्त करुन तांत्रिक व्यवसाय सुरु करण्यासाठी 3 ते 6 महिन्यापर्यंत मोफत प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती तीला मिळाली आणि धनश्रीने एमएससीआयटी संगणकाचा कोर्स करण्यासाठी महामंडळाकडे अर्ज सादर केला. महामंडळामार्फत धनश्रीने तीन महिन्याचे शासनमान्य संस्थेत एमएससीआयटीचे प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केले असून प्रशिक्षणासाठी धनश्रीला 3 हजार रुपयाचे विद्यावेतन ही मंजूर झाले आहे. तीच्याप्रमाणे इतर मुलींनीही स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच मोफत प्रशिक्षणांचा लाभ घेण्यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या इतर योजनेचा लाभ घ्यावा असे ती सांगते.

000000