नारायणगाव येथे फूड पार्कसाठी प्रयत्न करणार – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

0
8

पुणे, दि.१: ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत टोमॅटो आणि इतर भाजीपाला उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी नारायणगाव येथे फूडपार्क उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. त्याबाबत आणि शिवनेरी आंब्याला फळपीक विमा योजना लागू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्या श्री. शरदचंद्र पवार सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कृषिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कृषि संचालक कैलास मोते, विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नाईकवडी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, कृषि विकास अधिकारी अशोक पवार आदी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री.सत्तार म्हणाले, शेतकरी संपन्न व्हावा यासाठी शासन प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासोबत नैसर्गिक शेतीवरही भर देण्यात येत आहे. राज्यात श्री अन्न अभियान सुरू करण्यात आले असून त्यासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा आणि जोडव्यवसाय उपलब्ध करून देण्यावर भर आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेत राज्यातर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याने केंद्र आणि राज्याचे मिळून आता शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सुरू असलेल्या खरीप हंगामात केवळ १ रुपये भरुन पीक विम्याचा लाभ घेता येणार आहे.

शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत २ लाखापर्यंत मदत देण्यात येणार आहे. कृषि यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, प्रक्रिया उद्योगावरही भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि आयुक्तालयाने नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी विशेष कार्यक्रम आखावा, अशी सूचना त्यांनी केली.

कृषि आयुक्त श्री.चव्हाण म्हणाले, शेतकरी कुटुंबातून आलेल्या स्व.वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रासाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी शेती, औष्णिक वीज निर्मिती, ग्राम विकास, पंचायतराज, रोजगार हमी योजना, जलसंधारण अशा विविध कार्याच्या माध्यमातून राज्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला. कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यांच्या जयंती निमित्ताने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कृषि विभागाने केला आहे.

श्री.आयुष प्रसाद म्हणाले, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासनाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जुन्नर येथील शिवनेरी आंबा आणि पुरंदर अंजीरचे जीआय टॅगिंग करण्यात आल्याने त्याच्या निर्यातीसाठी लाभ होईल. पीक विविधतेसाठी जिल्ह्यात प्रयत्न करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेतही जिल्ह्याची कामगिरी चांगली आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत टोमॅटोसाठी फूड पार्क झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री.नाईकवडी म्हणाले, मागील आठवड्यात कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कृषि दिनाच्या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

कृषि मंत्री श्री.सत्तार यांच्या हस्ते पीक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. टोमॅटो आणि सोयाबीन पिकांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन असलेल्या घडीपत्रिकेचे मंत्रीमहोदयांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृत्य व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here