राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते राज्यस्तरीय उद्घाटन

0
6

सोलापूर, दि.  (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्यातील १५ ते २५ वयोगटातील मुली, युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे व हिंसाचाराच्या विरुद्ध त्यांचे मनोबल उंचावणे या हेतूने राबवण्यात येणाऱ्या राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आज येथे राज्यस्तरीय उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते पाटील, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रभारी कुलगुरू रजनीश कामत, महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिविक्षाधीन अधिकारी नितीन इरकल आणि दीपक धायगुडे , जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अतुल वाघमारे आदि उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत आज महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग येथे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. हे प्रशिक्षण दि. १५ जुलै पर्यंत देण्यात येणार असून, सोलापूर जिल्ह्यातील ५०, पश्चिम महाराष्ट्र ५०० तर संपूर्ण महाराष्ट्रातील ३ लाख ५० हजार महाविद्यालयातील युवतींना राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये एक हजार मुलींना आणि जिल्हास्तरीय एक हजार अशा एकूण १२ हजार युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत.

अलिकडील काळात महिला व मुलींवर होणारा हिंसाचार व त्यातून त्यांची केली जाणारी हत्या हे शासन व समाजासमोरील आव्हान ठरत आहे. त्यास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. शाळकरी व महाविद्यालयीन तरुण – तरुणी यांची जीवनशैली तंत्रज्ञानाने बदलली आहे व त्यातून सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. म्हणून राज्यातील युवतींना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण देणे व त्यांचे समुपदेशन करणे या हेतूने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आजपासून राज्यस्तरावर सुरू करण्यात येत आहे.

प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास हार घालण्यात आला. यावेळी मंत्री श्री. लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून युवतींना विविध प्रात्यक्षिकांतून स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here