जी २० संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम परिषदेत सदस्य देशांमध्ये संशोधनविषयक मंत्रीस्तरीय घोषणेवर चर्चा

मुंबई, दि. 4 : मुंबईमध्ये आजपासून सुरू झालेल्या जी 20 संशोधन आणि नवोन्मेष उपक्रम (रिसर्च अँड इनोव्हेशन इनिशिएटिव्ह) परिषदेत उपस्थित प्रतिनिधींचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. श्रीवारी चंद्रशेखर यांनी स्वागत केले.

वृद्धी आणि विकासामध्ये संशोधन, विकास आणि नवोन्मेष याची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन, डॉ. चंद्रशेखर यांनी जी 20 विज्ञान प्रतिबद्धता मंत्रीस्तरीय ठरावाचा मसूदा तयार करण्यामधील सर्व जी 20 सदस्य देशांच्या रचनात्मक सहभाग अधोरेखित केला.

भारताने आपल्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, 2023 मध्ये ‘समन्यायी समाजासाठी संशोधन आणि नवोन्मेष’ या संकल्पनेखाली एकूण पाच संशोधन आणि नवोन्मेष बैठका/परिषदा आयोजित केल्या आहेत. कलकत्ता येथे आयोजित करण्यात आलेल्या संशोधन आणि नवोन्मेष उपक्रमाच्या स्थापना बैठकीनंतर, रांची (संकल्पना: शाश्वत उर्जेसाठी साहित्य), दिब्रुगड (संकल्पना: चक्राकार जैव-अर्थव्यवस्था), धरमशाला (संकल्पना: ऊर्जा संक्रमणासाठी पर्यावरणपूरक नवोन्मेष), आणि दीव (संकल्पना: शाश्वत नील अर्थव्यवस्था) या चार ठिकाणी आरआयआयजी बैठका आयोजित करण्यात आल्या.

मुंबईत झालेल्या परिषदेच्या बैठकींमधील परिणामांच्या दस्तऐवजांवर आज चर्चा झाली. 2023 मध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात देशाच्या विविध भागांमध्ये झालेल्या बैठकांच्या मालिकेमधून आज झालेली बैठक जी 20 विज्ञान प्रतिबद्धतेचा कळसाध्याय होता.

उद्या 5 जुलै 2023 रोजी मुंबईत होणाऱ्या संशोधनविषयक मंत्रीस्तरीय बैठकीनंतर ठरावाचा दस्तऐवज प्रकाशित केला जाईल.