मुंबई,दि.६: विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अडचणी येऊ नयेत म्हणून सर्व अकृषी विद्यापीठांनी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील परीक्षा आणि निकाल याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त महेंद्र वारभुवन, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत संभाव्य वेळापत्रक जाहीर केलेले असते. त्यानुसार विद्यार्थी प्रवेशाचे नियोजन करतात. या पार्श्वभूमीवर पदवी परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर होणे गरजेचे असते. निकाल वेळेत जाहीर झाले नाहीत, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांना ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा असतो त्या अभ्यासक्रमापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि त्यांचा वेळ वाया जाऊ नये,यासाठी सर्व अकृषी विद्यापीठांनी विद्यार्थी हितासाठी वेळेत निकाल जाहीर होतील याचे नियोजन करून पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत दिल्या.
०००
काशीबाई थोरात/विसंअ/