महिलांनो… अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरेतून बाहेर पडा – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे आवाहन

0
6

        सांगली दि. 7 (जि. मा. का.) : बाल विवाह, हुंडाबळी, गर्भलिगनिदान  चाचणी यासह समाजातील अनेक अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरेचा महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. यासाठी महिलांनी अशा अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरेतून बाहेर पडले पाहिजे. याची सुरुवात प्रत्येक महिलेने स्वतःपासून करावी, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज येथे  केले.

            ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या जनसुनावणीप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार व विधी प्राधिकरणाचे अधिकारी आदि उपस्थित होते.

            श्रीमती चाकणकर म्हणाल्या, समाजात महिलांचे प्रश्न, समस्या अनेक आहेत. याची सोडवणूक करण्यासाठी शासन अनेक कायदे, नियम बनवते. या कायदे व नियमांची महिलांनी माहिती करून घ्यावी. नियम माहीत असल्यास त्रास देणाऱ्याला आपण जाब विचारू शकतो व आपले संरक्षण करू शकतो, असे त्यांनी सांगितले.

            श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या तक्रारी राज्य महिला आयोगाच्या मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष मांडता येत नाहीत, यासाठी राज्य महिला आयोगामार्फत महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जावून महिलांच्या तक्रारी, समस्यांचे निराकरण करून त्यांना न्याय मिळवून दिला जात आहे. जन सुनावणीमध्ये दाखल झालेल्या तक्रारींचे निराकरण करून त्या महिलांना न्याय देण्याची भूमिका आयोगाची आहे. जन सुनावणीतून महिलांचे प्रश्न, समस्या मार्गी लागतील, असा विश्वास श्रीमती चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केला.

            महिलांचे प्रश्न सोडवण्यास प्रशासनाने नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी सांगितले. कोरोना काळात एक पालक गमावलेल्या व दोन्ही पालक जिल्ह्यातील बालकांना मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनीही त्यांच्या काही तक्रारी असल्यास प्रशासनाकडे मांडाव्यात. आवश्यक त्या ठिकाणी अशा महिलांची नावे गोपनीय ठेऊन त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

            जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी प्रास्ताविक करून महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

            प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने जनसुनावणी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

जनसुनावणीत ८७ प्रकरणावर सुनावणी

            या जनसुनावणीत जिल्ह्यातील महिलांकडून प्राप्त झालेल्या 87 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. या मध्ये वैवाहिक/कौटुंबिकची 45 प्रकरणे, सामाजिक 11 प्रकरणे, मालमत्ता संदर्भात 9 प्रकरणे, कामाच्या ठिकाणी छळ 3 आणि इतर 19 प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांची 3 पॅनलद्वारे सुनावणी घेण्यात आली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here