सातारा दि. 7 : जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा करण्यात आला असून यामधील कामे विहित मुदतीत गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार करा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विभागाकडील सामान्य विकास व पध्दती सुधारण्यासाठीची कामे, सार्वजनिक बांधकामकडील कामे, ग्रामपंचायत, ग्रामीण रस्ते विकास, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, अंगणवाडी व शाळा दुरुस्ती, जलजीवन मिशन, कोयना पुर्नवसन आदी विषयांतील कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेवून पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येणारी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोर दक्षता घ्यावी, गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
कामांची निवड करत असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, जे ठेकेदार विहित मुदतीत व गुणवत्तापूर्ण काम करत नसतील अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी. अंगणवाडी आणि शाळा दुरुस्तीची कामे करत असताना मॉडेल स्कूलच्या धर्तीवर ही कामे करण्यात यावीत. जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली कामे विविध यंत्रणा राबवून गतीने पूर्ण करुन घेण्यात यावी. महाबळेश्वर तापोळा या ठिकाणी पर्यटन विकासाला चालना देणारी कामे तातडीने मार्गी लावावीत. धोकादायक स्थिती असणाऱ्या भागातील लोकांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्याबाबत यंत्रणांनी दक्षता घ्यावी. कोयना पुर्नवसनाच्या कामासाठी निधी उपलब्ध असून त्यासाठीच्या आवश्यक प्रशासकीय मान्यतेसाठी यंत्रणांनी पाठपुरावा करावा. अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी 20 जुलै अखेर यंत्रणांनी प्रशासकीय मान्यता घ्यावी व जुलै अखेर पर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करावी. कोणत्याही स्थितीत निधी शंभर टक्के खर्च होईल याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी, अशा सूचना दिल्या.