शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
7

मुंबई, दि. ७ : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले.

आज सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास श्री. ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री. ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

राज्यात अद्याप चांगल्या पावसाला सुरूवात झालेली नाही. पेरण्यांचे प्रमाणही कमी आहे, अशा परिस्थितीत नाशिक जिल्हा सहकारी बँक जिल्ह्यातील अल्प कर्जदार शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावत असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावू नका, असे सांगितले. दरम्यान, यासंदर्भात श्री. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने २० एप्रिल २०२३ रोजी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली होती. या बैठकीत नाशिक जिल्हा बॅंक सक्तीने वसुली करत असल्याचा मुद्दा चर्चीला गेला होता.

आज झालेल्या भेटीत श्री. ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास आदी विषयांवर चर्चा केली.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here