मानवी संवेदनेतून कवितेचा उगम – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
3

नागपूर,दि.९ : कायम माणसांच्या गर्दीत हरवणारे डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी मानवी संवेदनेतून विविध प्रकारच्या काव्यरचना करुन समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वसंतराव देशपांडे सभागृह येथे डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या ‘दिक्कालाच्या मांडवात’ आणि ‘काठावर दूर नदीच्या’ या काव्यसंग्रहांच्या प्रकाशन सोहळा तसेच डॉ. मनिषा कोठेकर यांच्या उंबरठ्यापल्ल्याड या लेखसंग्रहाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

मंचावर वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रकाशक चंद्रकांत लाखे, भारतीय स्त्री शक्तीच्या संस्थापक अध्यक्षा उर्मिला आपटे, कवि श्याम धोंड, डॉ. उपेंद्र कोठेकर, डॉ. मनिषा कोठेकर, मोरेश्वर निस्ताने उपस्थित होते. यावेळी डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या सांजरंग व राष्ट्ररंग या काव्यरचनांच्या ध्वनिफीतीचेही विमोचन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, डॉ.उपेंद्र कोठेकर हे उत्तम संघटक असून त्यांच्यातील राष्ट्रभावना, राष्ट्रप्रेम व समाजाप्रती असलेले समर्पण अतुलनिय आहे. या समर्पण भावनेतून त्यांनी काव्यनिर्मिती केली आहे. प्रेम, मानवी भावभावनासह सखल रंगात्मक कविता डॉ. कोठेकर यांनी रचली आहे. माणसाच्या गर्दीत हरवलेल्या, संघटनकलेत निपुण असणाऱ्या, सिद्धहस्त कवीची मानवी संवेदना व्यक्त करण्याची कला कवितेत प्रतीत होत असल्याचे, ते यावेळी म्हणाले.

मनिषा कोठेकर यांचाही सामाजिक कार्यातील वाटा फार मोलाचा असून एका विचाराने प्रेरित होऊन त्यांनी स्त्रीशक्तीसाठी सतत लेखन केल्याचे उपमुख्यमंत्री श्री.  फडणवीस यांनी सांगितले.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, माणसाच्या गर्दीतील कवितेची निर्मिती डॉ. कोठेकर यांनी केली. विद्यार्थी असतांना त्यांनी उत्तम संघटन तयार करुन आपल्या कार्याला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. यावेळी श्याम धोंड, उर्मिला आपटे यांनी आपले विचार व्यक्त केले. केंद्रीय भुपृष्ठ व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दृकश्राव्य संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात आषाढरंग या सांगितीक कार्यक्रमाने झाली. श्वेता शेलगावकर व रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी, रसिक, श्रोते उपस्थित होते.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here