पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडून ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमस्थळाची पाहणी

धुळे, दि. ९ (जिमाका ) : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार, १० जुलै, २०२३ रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत एसआरपीएफ मैदान, धुळे येथे होणार आहे.

या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार मंगेश चव्हाण, महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेशवरी एस., जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, मुख्यमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित हुक्केरीकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपमहापौर वैशाली वराडे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावडे, परिविक्षाधीन सनदी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. महाजन यांनी मुख्य स्टेज, सभा मंडप, लोकप्रतिनिधींची व मान्यवर बैठक व्यवस्था त्याचबरोबर लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, सरपंचांची बैठक व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, रोजगार मेळावा, आरोग्य शिबिर जागा, पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आदींची पाहणी केली. प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी श्री. शर्मा व पोलीस अधिक्षक श्री. बारकुंड यांचेकडून जाणून घेतल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केलेले आहे. कार्यक्रमाच्या दिवशी येणाऱ्या नागरीक, लाभार्थ्यांची गैरसोय होवू नये याची दक्षता घ्यावी. वाहनतळ ते कार्यक्रमस्थळावरील मार्गावर वाहतुकीचे नियोजन व्यवस्थीत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्यात. तसेच शासन आपल्या दारी या मुख्य कार्यक्रमास जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी केले.

‘शासन आपल्या दारी’कार्यक्रमाचा डॉ. अमोल शिंदे यांनी घेतला आढावा

शासन आपल्या दारी अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक येथील एसआरपी कॅम्प, धुळे येथे आज मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी  डॉ. शिंदे म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’हा उपक्रम शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, लाभार्थी आणि स्वयंसेवकांच्या समन्वयातून राज्यात राबविण्यात येत आहे. राज्यात आजपर्यंत विविध जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी झाला असून या उपक्रमांस राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. धुळे जिल्ह्यातआज होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था करावी. उपस्थित राहणाऱ्या दिव्यांग लाभार्थींची स्वतंत्र्य बैठक तसेच लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी नेण्याची व्यवस्था करावी. मुख्यमंत्री महोदय स्टॉलला भेट देण्याची शक्यता असल्याने त्यासाठी यंत्रणेने सतर्क राहून परिपूर्ण नियोजन करावेत. लाभार्थींना वाटप करण्याच्या वस्तू व्यवस्थित लावाव्यात. स्टॉलवर भेट देणाऱ्या नागरिकांना संपूर्ण योजनेची परिपूर्ण माहिती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणेला दिल्यात.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

०००