नेदरलँड्सचे कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांनी घेतली उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट

0
9

मुंबई दि. ११: भारत आणि नेदरलँड्स देशांमध्ये मैत्रिसंबंध दृढ असून आगामी काळात कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मेरीटाईम, जलव्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात आणखी सहकार्य, तंत्रज्ञान विषयक आदान-प्रदान व्हावे यादृष्टीने विपुल संधी उपलब्ध आहेत, असे मत विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि नेदरलँडचे मुंबईतील कार्यकारी महावाणिज्यदूत चिअरी हेल्डन यांनी व्यक्त केले.

श्री. हेल्डन यांनी आज विधानभवनातील उप सभापती यांच्या दालनात त्यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी श्री. हेल्डन यांच्यासमवेत नेदरलँड्स उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी सौरभ सांगळे हे देखील उपस्थित होते.

युरोपीय देशांमधील संसद, संसदीय समित्या, महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, महिला संरक्षण विषयक कायदे, ज्येष्ठांसाठीचे कायदे, बाल आणि महिलांची तस्करी रोखण्यासाठीच्या उपाययोजना इत्यादी संदर्भात दोन्ही देशांच्या लोकप्रतिनिधींसाठी चर्चा-अभ्यासभेटींचे आयोजन करण्यात येणार आहे. नेदरलँड्समध्येदेखील अभ्यासभेटींचे आयोजन करण्यात आले आहे. नेदरलँड्समधील आगामी अभ्यासभेटीसंदर्भातील नियोजन यादृष्टीने यावेळी चर्चा करण्यात आली. भारत आणि नेदरलँडचे संबंध व्यापार आणि सामाजिक दृष्टीने अधिक दृढ व्हावेत अशी अपेक्षा श्री. हेल्डन यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आरोग्य, कृत्रीम बुद्धीमत्ता, माहिती व तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन या क्षेत्रात आणखी करारमदार व्हावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रात नगरपालिकास्तरापर्यंत घनकचरा व्यवस्थापनासाठी सामजंस्य कराराच्या माध्यमातून काम सुरू व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत वातावरणीय बदल, प्रदूषण, महिलांचे सामाजिक प्रश्न, स्त्री-पुरूष समानता यासंदर्भात विचार मांडले. 13 सप्टेंबर, 2023 रोजी जागतिक महिला धोरणासंदर्भात परिषद होत आहे. त्यात नेदरलँड्सचे प्रतिनिधी म्हणून सहभागी व्हावे, असे निमंत्रण उप सभापती यांनी श्री. हेल्डन यांना दिले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here