‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे – पालकमंत्री दादाजी भुसे

0
10

नाशिक, दिनांक 11 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम शनिवार 15 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पूर्वतयारी नियोजनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक व मालेगाव अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब पारधे, माया पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष तर तालुक्यातील तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, कार्यक्रमाच्या दिवशी लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेसचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येवून प्रत्येक बसमध्ये ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात यावी. जेणे करून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणे व परत घेवून जाणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे कार्यक्रम स्थळी व पार्किंगच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, डॉक्टरांच्या टीम व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांच्या दोनवेळच्या जेवणाच्या व्यवस्था, कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी याबाबत देखील नियोजन देखील करण्यात यावे.

संभाव्य पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन शहराच्या नजीकच्या तालुक्यातील लाभार्थी संख्या जास्त असावी. तसेच लाभार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेबाबत सर्व यंत्रणेमध्ये समन्वय राखण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात एखादी मोबाईल ॲप्लीकेशन तयार करण्यात यावे, ज्यामुळे लाभार्थ्यांच्या वाहतूकीचे नियोजन करणे सोयीचे होईल, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करतांना, पर्यटन विभागामार्फत पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी किर्तनकार व भारूडांचे सादरीकरण करण्यात आले होते. त्या कार्यक्रमांच्या धरतीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात येत होती. त्याचप्रमाणे ज्या पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांमुळे लाभ झाला आहे, अशा लाभार्थ्यांचे अनुभव कथन करणाऱ्या लहान छायाचित्रीकरणाच्या क्लिप्स बनविण्यात येऊन त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखवण्‍याचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत.

पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत साधारण 8 लाख 91 हजार पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. येत्या दोन तीन दिवसांच्या कालावधीत अधिकारी यांनी गावोगावी जावून शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यसाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या स्टॉल्सवर शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.

शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी त्या दिवशी करण्यात येणाऱ्या वाहतूक व्यवस्थेमधील बदल लक्षात घेवून सर्व नाशिककरांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

या बैठकीनंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी डोंगरे वसतीगृह मैदान या कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी कार्यक्रमासाठी तयार करण्यात येणारी मंडप व्यवस्था, विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स, लाभार्थ्यांच्या आसन व्यवस्था याबाबत चर्चा केली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुधंती शर्मा, कार्यकारी अभियंता

उदय पालवे, उपजिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे, भिमराज दराडे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here