अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिलच्या कामगारांचे वेतन नियमित आणि वेळेत करावे – वस्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 11 : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिलच्या कामगारांना देण्यात येत असलेले अर्धे वेतन नियमित व वेळेत देण्यात यावे, अशा सूचना वस्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात फिनले मिल विषयी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना ते बोलत होते.

यावेळी आमदार बच्चू कडू, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, वस्रोद्योग विभागाचे एस.के.सिंग, नॅशनल टेक्स्टाईल कार्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.

विदर्भातील या फिनले मिलमधील ९०० कामगारांना रोजगार मिळण्यासाठी राज्य शासनाकडून २० कोटी रुपयांची तरतूद करण्याची तयारी असून केंद्र सरकारने मिल सुरू करावी यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की,या मिलमधील कामगारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच मिल पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय वस्रोद्योग मंत्री पियूष गोयल यांना तत्काळ पत्र पाठविण्यात येईल.

0000

राजू धोत्रे/विसंअ/