सप्तश्रृंगी घाट बस अपघातातील जखमी प्रवासी रूग्णांची मंत्री अनिल पाटील यांनी भेट घेऊन केली विचारपूस

नाशिक, दिनांक 12 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा) : सप्तश्रृंगी घाट येथे आज सकाळी झालेल्या बस अपघातातील प्रवासी रूग्णांची मंत्री अनिल पाटील यांनी भेट घेऊन विचारपूस केली. गंभीर जखमी रूग्णांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून शासनस्तवर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज सकाळी कळवण येथे सप्तश्रृंगी घाटात एस टी बसला अपघात झाला. अपघातात एक महिला प्रवासी मृत झाली असून इतर जखमी 22 प्रवाशांना नाशिक जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मंत्री अनिल पाटील यांनी आज उपचारार्थ दाखल केलेल्या 22 रूग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी समवेत प्रभारी जिल्हा चिकित्सक डॉ.अरूण पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. गोपाळ शिंदे, अतिदक्षता कक्षाचे डॉ. प्रतिक भांगरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एकूण 22 प्रवासी रूग्णांवर शासकीय खर्चात उपचार करण्यात येत आहेत. दाखल केलेल्या रूग्णांपैकी अतिदक्षता कक्षात 3 रूग्ण असून आपत्कालिन कक्षात 19 रूग्ण असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.

0000000000