पुणे, दि. 14: क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथे समाजाला प्रेरणादायी आणि भव्य असे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीच्या सूचना विचारात घेऊन तातडीने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस आमदार सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, समाजकल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, उपाध्यक्ष शिवाजी राजगुरू आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी या स्मारकाच्या अनुषंगाने कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. हे स्मारक लवकरात लवकर उभे रहावे अशी शासनाची भूमिका आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, त्यासाठी स्मारकात समाविष्ट करावयाचे संग्रहालय, त्यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शन, शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आदी तपशीलाबाबत समितीने चर्चा करुन निर्णय घ्यावा. स्मारकाचा आराखडा समितीच्या सूचनेनुसार तयार करण्यात यावा. स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे श्री. पाटील यावेळी म्हणाले.
यावेळी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी या स्मारक, संग्रहालयासाठी सुमारे साडेपाच एकर जागा संपादित केली असून ती पूर्णता महापालिकेच्या ताब्यात असल्याचे सांगितले. जमीन संपादनासाठी सुमारे १०१ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित वास्तूविशारदांनी स्मारकाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले. त्यावर मंत्रीमहोदय तसेच समिती सदस्यांनी काही सूचना दिल्या.