मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
3

मुंबई, दि. 19 : आपल्या पूर्वजांनी मराठवाडा मुक्तीसाठी अतिशय संयमाने दिलेल्या या लढ्याचे मोल भारतीय स्वातंत्र्य लढ्याइतकेच आहे. हा इतिहास नव्या पिढीला समजावा, स्वातंत्र्य व सहिष्णुता ही मूल्ये पुढील पिढीत रुजावित यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत व्यक्त केले.

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्य सेनानींना  व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा प्रस्ताव सादर करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस विधान परिषदेत बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्रामातील सर्व शहिदांना, स्वातंत्र सैनिकांना अभिवादन करतो. मराठवाड्याला संत एकनाथांपासून, संत जनाबाई पासून, आद्यकवी मुकुंदराज, माळकरी-वारकऱ्यांपासून जी सहिष्णुतेची परंपरा मिळाली आहे  आणि याच विचारावर मराठवाडा मुक्तिसंग्रामातील लढ्याला एक समता आणि सहिष्णूतेचा विचार मिळाला होता.

एकाबाजुला अखंड भारत इंग्रजांच्या जोखडातून 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झाला, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण मराठवाड्याला निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी 17 सप्टेंबर 1948 पर्यंत  म्हणजे 13 महिने वाट पाहावी लागली. भारतीय स्वातंत्र्याच्या तब्बल 13 महिन्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष आपण पूर्ण करीत आहोत. या अमृत महोत्सवी पर्वाचा साक्षीदार होताना मी स्वत:ला भाग्यवान समजतो.भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात ५६० हून अधिक संस्थाने होती. तांत्रिकदृष्ट्या त्या संस्थानांवर ब्रिटीशांचे राज्य नव्हते. त्यामुळे ब्रिटीश गेल्यानंतर भारत एकसंघ राष्ट्र होण्यासाठी त्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण होणे गरजेचे होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी केवळ ४० दिवसात अत्यंत वेगाने हे विलीनीकरण पूर्ण करून दाखवले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले ,जेव्हा संपूर्ण भारत स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा करीत होता तेव्हा स्वातंत्र्यानंतर एका वर्षाहून अधिक काळ हैदराबाद संस्थानातील जनता  व विशेषत: मराठवाड्यातील जनता अनन्वित अत्याचारांचा सामना करत होती. भारताच्या नाभीस्थानी स्वतंत्र देश निर्माण करू पाहणाऱ्या निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध मराठवाड्यातील जनतेने  स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात हा मुक्ती लढा दिला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिंगबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, भाऊसाहेब वैशंपायन, देवीसिंग चौहान, बाबासाहेब परांजपे, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा वगैरे मंडळींच्या समर्थ नेतृत्वामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त झाला.

भारतातील सार्वभौमत्त्व, एकात्मता आपण अनेक संघर्षातून  टिकवली आहे. इतिहासातील हा लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचवून यातील स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचे मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे असे मत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here