पालकमंत्री संजय राठोड पूरग्रस्तांच्या दारी

यवतमाळ, दि 24 (जिमाका) : पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पूरग्रस्त ग्रामीण भागाच्या पाहणी करीत आहे. नुकसानग्रस्तांच्या दुःखात सहभागी होऊन मदतीबाबत आश्वस्त केले. ठिकठिकाणी त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला.

सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूरस्थिती आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस, दारव्हा आणि नेर तालुक्यातील पूरग्रस्त भागात जाऊन ग्रामस्थांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांना गावातील शाळा, चावडीच्या ठिकाणी एकत्रित करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मदतीसाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांची माहिती पालकमंत्री राठोड यांनी दिली. त्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

अनेकजण आपल्या बोली भाषेत पालकमंत्र्यांसमोर गाऱ्हाणी मांडत होते आणि त्यांचे आभारही मानत होते. पालकमंत्री राठोड यांच्या नुकसानग्रस्त गावांच्या पाहणी दौऱ्यात ‘पालकमंत्री आपल्या दारी’ आल्याची भावना व्यक्त होत होती. या भेटीत पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी असून लवकरच शासनाच्या मदत वितरीत केली जातील, असे सांगितले.

कधीही हाक द्या मदत करणार

या दौऱ्यादरम्यान नेर येथील विश्रामगृहात थांबले होते .त्यावेळी महिन्याभरपूर्वी नेर तालुक्यातील उमरगा येथील अमोल प्रल्हाद भुसारे यांचा शेतात वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी कल्पना अमोल भुसारे यांना चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश पालकमंत्री संजय राठोड यांनी सुपूर्द केला. अमोल भुसारे हे माझ्या नजीक होते. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला याचा आजही विश्वास बसत नाही. झालेली दुर्घटना ही दुर्दैवी असून आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत, असे सांत्वन करून ‘मी तुमच्या भावासारखा आहे. कधीही हाक द्या मदत करणार, असा  पालकमंत्री राठोड यांनी कुटुंबियांना धीर दिला.

000