विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
6

वाळूज ते कमळापूर रस्ता दुरुस्तीचे काम मे २०२४ पर्यंत

पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

 

मुंबई दि. २५ : वाळूज ते कमळापूर (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील रस्त्याच्या दुरूस्तीचे प्रलंबित काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.

वाळूज ते कमळापूर येथील रस्ता दुरुस्तीच्या कामासंदर्भात सदस्य सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, वाळूज ते कमळापूर या 4 कि.मी. लांबीपैकी 3 कि.मी. लांबीतील रस्ता दुरुस्ती करण्याचे काम प्रगतीत आहे. या कामाला निधीही मंजूर आहे. या रस्त्यावर 1 कि.मी. लांबीत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे व बांधीव गटाराचे मंजूर काम सद्यस्थितीत प्रगतीत असून या रस्त्याचे सर्व काम मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले असून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत असल्याचे मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य सर्वश्री विक्रम काळे, गोपीचंद पडळकर, जयंत पाटील, महादेव जानकर आदींनी सहभाग घेतला.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

दोषी शिक्षणाधिकाऱ्यांवर चौकशीअंती नियमानुसार

कारवाई करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सन 2022-23 मध्ये 23 शिक्षणाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये दोषी शिक्षणाधिकाऱ्यांवर चौकशीअंती नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील 23 शिक्षणाधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीबाबत सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, या प्रकरणी एका प्रकरणात चौकशीअंती संबंधित अधिकाऱ्याविरूद्ध शिक्षा बजाविण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणी चौकशीची कार्यवाही सुरू आहे. चौकशीअंती संबंधित दोषींविरुद्ध प्रचलित नियमानुसार पुढील कार्यवाही करणे शक्य होईल, असे मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, प्रा. राम शिंदे, सत्यजित तांबे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र प्रणालीद्वारे भरण्याची

कार्यवाही सुरू – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदापैकी 30 हजार पदे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासंदर्भात सदस्य सुधाकर अडबाले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षण अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणीच्या (टेट) आयोजनाबाबतचे वेळापत्रक उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणी 22 फेब्रुवारी, 2023 ते 3 मार्च,2023 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली असून, परीक्षेमध्ये उमेदवारांस प्राप्त गुणांकनाच्या आधारे राज्यात अंदाजे 30 हजार शिक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.

यानुसार जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली व विषयांची माहिती पोर्टलवर भरून पदभरती करण्याचा कार्यक्रम असा आहे, जाहिरात देण्याचा कालावधी १५/०८/२०२३ ते ३१/०८/२०२३,उमेदवारांना जाहिरातीनुसार जिल्हा परिषदांना प्राधान्यक्रम देणे.  ०१/०९/२०२३ ते १५/०९/२०२३, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे दि. १०/१०/२०२३, मुलाखतीशिवाय पदभरतीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे. दि. ११/१०/२०२३ ते दि. २१/१०/२०२३, पदस्थापनेसाठी समुपदेशनाचे आयोजन जिल्हास्तरावर करणे. दि. २१/१०/२०२३ ते २४/१०/२०२३ असे आहे.

तसेच शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘पवित्र’ प्रणालीमार्फत नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्याबाबतच्या सूचना देखील आयुक्त (शिक्षण), सर्व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी यांना ७ जुलै २०२३ रोजीच्या शासन पत्रान्वये देण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.

या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here