उद्या सकाळपर्यंत पावसाचा अंदाज घेऊन निवारागृहातील नागरिकांना घरी सोडण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

0
8

कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : राधानगरी धरण 100 टक्के भरल्यामुळे बुधवारी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले. मागील दोन दिवसात जिल्ह्यात हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी पाऊस झाल्याने एक दरवाजा बंद झाला आहे. पंचगंगेची पाणीपातळी पाच ते सहा फूट वाढेल या अंदाजाने प्रशासनाने तयारी केली होती. मात्र सुदैवाने पाऊस कमी झाल्यामुळे पाणी पातळी वाढली नाही. शुक्रवार सकाळपर्यंत पावसाचा अंदाज घेवून निवारागृहातील नागरिकांना घरी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्या. तसेच पुढील 24 तासात जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पावसाचा जोर पाहून विसर्गाचे चांगल्या प्रकारे सनियंत्रण करण्याच्या सूचनाही त्यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या.

जिल्ह्यातील पूरस्थिती बाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. केसरकर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सध्याच्या पूरस्थिती बाबत माहिती दिली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले, आपत्तीजन्य स्थितीत प्रशासनाने कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये, यासाठी उपाययोजना राबवाव्यात. जिल्ह्यातील लोकांची गैरसोय होऊ देऊ नका, असे सांगून पावसाचा अंदाज घेवून शुक्रवार पासून पूरबाधित भागातील बंद ठेवण्यात आलेल्या शाळा पुर्ववत सुरु कराव्यात असे त्यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून बालिंगा येथील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. याबाबत नागरिकांची मागणी व गैरसोय होऊ नये म्हणून पालकमंत्री केसरकर यांनी याबाबत आवश्यक तपासण्या करुन एकेरी वाहतूक सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. पुलावरील वाहतूक सुरु करताना त्या ठिकाणी आवश्यक बंदोबस्तासह वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

खासबाग मैदानामधील बांधकामाची तपासणी करुन स्ट्रक्चरल कन्सल्टंट मार्फत ऑडिट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ऐतिहासिक खासबाग मैदानाची तपासणी करुन जीर्ण झालेल्या व पडलेल्या भागाचे पुन्हा आहे त्या प्रकारे बांधकाम करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. भविष्यात पुन्हा अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून नवीन बांधकाम करताना भक्कम व  चांगल्या गुणवत्तेचे करा, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील पूर स्थितीमुळे बंद असलेले राज्य मार्ग व जिल्हा मार्ग याबाबत आढावा घेतला. रस्ते बंद असलेल्या गावांमधील आवश्यक धान्य, सिलेंडर, पेट्रोल, औषधांचा साठा याबाबतही त्यांनी माहितीही जाणून घेतली.

 यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी संबंधित गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याआधीच सर्व आवश्यक साहित्याचा पुरवठा मुबलक स्वरुपात करण्यात आल्याची माहिती दिली.

खासबाग मैदान दुर्घनेतील महिलेच्या कुटुंबियांची पालकमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट

दोन दिवसांपूर्वी शहरातील खासबाग मैदानाची संरक्षक भिंत पावसाने खचल्यामुळे भिंत कोसळून दोन महिला त्यात अडकल्या होत्या. यातील श्रीमती अश्विनी आनंदा यादव या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिवंगत श्रीमती यादव यांच्या घरी भेट देवून कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी सोबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी मृत श्रीमती यादव यांचे पती व दोन मुले यांची भेट घेऊन घडलेल्या घटनेबाबत चर्चा केली व त्यांचे सांत्वन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here