विधानसभा प्रश्नोत्तरे :

0
7

राज्यातील नवीन साकवांसाठी १३०० कोटींचा आराखडा – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 28 : राज्यातील डोंगरी तालुके, कोकण आणि आदिवासी भागातील सर्व रस्ते बारमाही वाहतुकीसाठी जोडण्यासाठी नवीन साकव व्हावेत अशी अनेक ठिकाणांवरून मागणी आहे. यासाठी सुमारे १३०० कोटींचा आराखडा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी  विधानसभेत दिली.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील शिंदी ते आरव येथील लोखंडी पूल दुरुस्ती दरम्यान झालेल्या अपघाताबाबत विधानसभा सदस्य रईस शेख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, महाबळेश्वर तालुक्यातील शिंदी ते आरव दरम्यानच्या तुटलेल्या पुलाच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली असून ते काम पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण केलं जाईल. या आराखड्यातून ओढे, नाले यावरील छोटे पूल पक्क्या स्वरूपात बांधले जातील आणि अशा साकवांसाठी एक कोटीपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जाईल.

यावेळी सदस्य सर्वश्री रवी पाटील, योगेश कदम, संग्राम थोपटे, प्रकाश आबिटकर यांनी सहभाग घेतला.

००००

धुळे जिल्ह्यातील स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या शाळांचे ऑडिट लवकरच करणार  मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 28 : धुळे जिल्ह्यातील शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. ज्या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट राहिले आहे, अशा शाळांनी लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना देण्यात येतील, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट करून शाळेत अग्निरोधक यंत्रणा बसविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील अनेक शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले आहे. यामध्ये जवळपास 80 टक्के शाळांमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या शाळांनी स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही, अशा शाळांनी तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून अग्निरोधक यंत्रणा बसवावेत अशा सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात /विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here