मुंबई उपनगरातील रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत काँक्रीटीकरण करणार : पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.३० : अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा.  सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे,  यासाठी  तातडीने खड्डे भरावेत.  नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळावेत यासाठी मुंबई उपनगरातील सर्व रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना  मुंबई  उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या.

मुंबई उपनगर मधील के पश्चिम वॉर्ड, के पूर्व वॉर्ड व एल वॉर्ड येथील इर्ला मार्ग जंक्शन, व्ही. एम. मार्ग आणि एस. व्ही. मार्ग जंक्शन,सहार मार्ग जंक्शन, साकीनाका जंक्शन, कांजूरगाव इत्यादी ठिकाणी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रस्त्यांची पाहणी केली. यावेळी ते  बोलत होते.  स्थानिक लोकप्रतिनिधी, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासु, उपायुक्त रस्ते संजय महाले, प्रमुख अभियंता (रस्ते) मनीषकुमार पटेल आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.लोढा यांनी अंधेरी येथील साकीनाका रोड, सागर हॉटेल आणि गुलमोहर रोड येथे अधिकाऱ्यांसमवेत रस्त्यांची पाहणी करून ज्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती करणे आवश्यक आहे असे खड्डे कोणताही विलंब न करता भरले जावेत अशा सूचना अधिकाऱ्‍यांना केल्या. तसेच यावर्षी महापालिकेने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे सब-वेमध्ये पाणी भरण्याची समस्या कमी झाली असल्याबद्दल पालिका प्रशासनाचे आभार मानले. पश्चिम उपनगरांमध्ये पावसामुळे रस्त्यांवर तयार झालेले खड्डे भरण्यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट, मास्टीक अस्फाल्ट तंत्रज्ञान वापरून सुरू असलेल्या कामांची पाहणी  पालकमंत्री श्री. लोढा यांनी केली.

०००