लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन

        सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज अभिवादन केले.

            तद्नंतर पालकमंत्री डॉ. खाडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या शिल्पसृष्टीस भेट देऊन पाहणी केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, बार्टीचे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण, जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्षा नंदिनी आवडे, सत्यजीत देशमुख, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, डॉ. प्रेम हनवते, विकास गायकवाड, रामदास लोखंडे, समाधान दुधाळ, गणेश सवाखंडे, सरपंच नंदा चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील आदि उपस्थित होते.

            साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या वतीने वाटेगाव येथे विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिवादन सभाही झाली. या सभेत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी राज्य शासनाने त्यांच्या स्मारकासाठी अर्थसंकल्पात 25 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यावेळी त्यांनी उपस्थितांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

            बार्टी संस्थेच्या वतीने भारतीय राज्यघटनेची प्रत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व इतर महापुरुषांच्या जीवनातील दुर्मिळ पुस्तके विक्री स्टॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते अनुयायांना पुस्तके देऊन करण्यात आले.

            यावेळी शाहीर राजेंद्र कांबळे, अमर पुणेकर, अशोक गायकवाड, आर. के. भोसले आदि कलाकार व संच यांनी महापुरुषांच्या जीवनावरील शाहिरीच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन केले. यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व समतादूत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व अण्णा भाऊ साठे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            दरम्यान, सांगलीच्या पुष्कराज चौक येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.