माणसाच्या जीवनात बदल घडवण्याची क्षमता महसूल विभागात- पालकमंत्री विजयकुमार गावित

नंदुरबार: दिनांक १ ऑगस्ट २०२३ (जिमाका वृत्त) भारतीय प्रशासन यंत्रणेत माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जर कुठल्या विभागाशी वारंवार संबंध येत असेल तर तो महसूल विभाग असून मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता या विभागात आहे. तसेच कुठल्याही शासकीय यंत्रणेला आपले उद्दिष्ट गाठण्यासाठीचा संवाद सेतू महसूल यंत्रणेतूनच निर्माण होतो, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आयोजित महसूल दिन-सप्ताह च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा परिषद कृषि सभापती हेमलता शितोळे सर्व तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी शुभेच्छा देताना डॉ. गावित म्हणाले, महसूल विभागाच्या कामातून ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ ची जनकल्याणाचा संकल्पना साकार होताना आपल्याला दिसते. संपूर्ण देश, राज्य आणि लोकशाही टिकवण्याचे कार्य महसूल विभागाच्या माध्यमातून होत असते. शेवटचा माणूस हा केंद्रबिंदू मानून अहोरात्र काम या विभागाचे अधिकारी व कर्मचारी करत असतात. जिल्हा व विभागस्तरावर कुठल्याही विभागाला आपले काम, उद्दिष्टापर्यंत नेण्यासाठी महसूल विभागाशिवाय पर्याय नसतो. कमालीची व्यापकता आणि तितकीच कमाल सतर्कता ठेवून महसूल विभाग काम करत असल्यामुळे आज मानवी जीवन समृद्ध होताना आपल्याला दिसते आहे. माहिती तंत्रज्ञानाने तर विभागाला मानवी जीवनाच्या परमोच्च अचुकतेवर आणून ठेवले आहे, म्हणूनच विकासाचे स्वप्न साकार होण्याचा विश्वास आपल्याला पदोपदी जाणवतो, त्यामुळे अशा एका दिनातून किंवा सप्ताहातून नाही तर क्षणोक्षणी, पदोपदी या विभागाचे अधिकारी, कर्मचारी कौतुकास पात्र असल्याचेही पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

कोरोना काळात केलेल्या कामगिरीचे कौतुक करून भविष्यात संपूर्ण जिल्हावासीयांचे  जीवन समृद्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी केले. यावेळी ई-ऑफिस प्रणाली साथीच्या १४५ संगणकांचे संच संबंधित यंत्रणांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले. व वर्षभर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव पालकमंत्री व उपस्थितींच्या हस्ते करण्यात आला.

यांचा झाला गौरव….

 तहसिलदार – रामजी राठोड, तहसिल कार्यालय अक्कलकुवा व मिलिंद कुलकर्णी तत्कालीन तहसिलदार, तहसिल कार्यालय शहादा.

नायब तहसिलदार- विजय गोस्वामी, सरदार सरोवर प्रकल्प कार्यालय तळोदा व श्रीमती सुरेखा जगताप, तहसिल कार्यालय नवापूर.

अव्वल कारकुन – कैलास कुवर, सरदार सरोवर प्रकल्प कार्यालय नंदुरबार.

मंडळ अधिकारी – महेंद्र गावीत, अक्कलकुवा, तहसिल कार्यालय अक्कलकुवा.

तलाठी – प्रशांत वळवी, रायपूर, तहसिल कार्यालय नवापूर व  राजेश पवार, बोरवण, तहसिल कार्यालय अक्राणी.

महसूल सहाय्यक – महेंद्र गिरासे, जिल्हा पुरवठा कार्यालय नंदुरबार, दौलत वळवी, तहसिल कार्यालय नंदुरबार, शरद बोरसे, तहसिल कार्यालय अक्कलकुवा व कपिल परदेशी, तहसिल कार्यालय शहादा.

वाहनचालक – अझरुद्दीन काझी, तहसिल कार्यालय अक्राणी.

शिपाई – सिताराम गवळी, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, तेजस वाडीले, उपविभागीय कार्यालय नंदुरबार, विश्वजित वसावे, तहसिल कार्यालय नंदुरबार, रोनक गावीत, तहसिल कार्यालय अक्कलकुवा, व  राजेंद्र शिंदे, तहसिल कार्यालय शहादा.

कोतवाल – प्रदीप प्रधान, रायंगण, तहसिल कार्यालय नवापूर, विलास ठाकरे, तळवे, तहसिल कार्यालय तळोदा, व भारत नरवे, ब्राम्हणपूरी, तहसिल कार्यालय शहादा.

पोलीस पाटील – श्रीमती दिपमाला पाटील, विखरण, तहसिल कार्यालय नंदुरबार व  आंबिलाला वसावे, अस्तंबा, तहसिल कार्यालय अक्राणी.

 

असा असेल महसूल सप्ताह…

 युवा संवाद: बुधवार, 2 ऑगस्ट, 2023 रोजी “युवा संवाद” उपक्रम आयोजित करण्यात येणार असून यात दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरीता शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले, प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल करणे, आधारकार्ड दुरुस्ती केंद्रावर शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करणे, अद्ययावत करणे तसेच शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत.

एक हात मदतीचा: गुरुवार, 3 ऑगस्ट, 2023 रोजी ‘एक हात मदतीचा’ या  कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मान्सुन कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे, फळबागांचे, जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आपत्ती व्यवस्थापनाच्या तरतुदीनुसार बाधीत नागरिकांना देय असलेल्या सोईसुविधा, नुकसान भरपाई देण्याबाबत आढावा घेण्यात येईल. तसेच खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या पिकांचा विमा उतरविण्याकरीता अर्जदारांच्या मागणीनुसार, पिक पेरा अहवाल, सात बारा व 8-अ सारखे उतारे, तलाठीस्तरावरुन देय असलेले विविध दाखले देण्यात येणार आहेत. तसेच  अतिवृष्टी, पुर अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाकडून माहिती देण्यात येईल व तालुक्याच्या अतिदुर्गम गावात महसूल अदालतींचे आयोजन करण्यात येईल.

जनसंवाद: शुक्रवार, 4 ऑगस्ट, 2023 रोजी “जनसंवाद” कार्यक्रमात महसुल अदालतीचे आयोजन करुन प्रलंबित असलेली प्रकरणे, अपिले निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच सलोखा योजनेंत गावा-गावांतील व शेतातील रस्त्यांबाबत तलाठी, मंडळस्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्याकरीता शिबीरांचे आयोजन करण्यात येईल. तसेच जमिनविषयक आवश्यक असणाऱ्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी प्राप्त अर्जावर कार्यवाही करुन अर्ज निकाली काढण्यात येतील. तसेच “आपले सरकार” या पोर्टलवर प्राप्त तक्रारींचीही दखल घेऊन या तक्रारी निकाली काढण्यात येणार आहेत.

सैनिकहो तुमच्यासाठी… शनिवार 5 ऑगस्ट, 2023 रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी” या कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या सीमावर्ती भागामध्ये तसेच अन्य संवेदनशील भागांमध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयांकडून निर्गमित होणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे मिळणेबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यात करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही तसेच संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना घरासाठी, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत.

एक संवाद सेवानिवृत्तांशी:  रविवार, 6 ऑगस्ट, 2023 रोजी ‘महसुल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यात महसूल संवर्गातील जिल्ह्यात कार्यरत असलेल्या, सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढण्यात येणार आहेत.

सप्ताहाची सांगता: सोमवार, 7 ऑगस्ट, 2023 रोजी  “महसूल सप्ताह सांगता समारंभ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यात महसूल यंत्रणेमार्फत या कालावधीत राबविलेल्या कार्यक्रमांची फलनिष्पत्ती व विशेष उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन महसूल सप्ताहाचा सांगता समारंभ करण्यात येणार आहे.