शहापूर दुर्घटनेची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी

0
9

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळील सरलांबे येथील समृध्दी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री गर्डर कोसळून झालेल्या अपघातात २० मजुरांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाल्याची दुर्घटना घडली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी घटनास्थळी जाऊन जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत परिस्थितीची पाहणी केली. तसेच यावेळी दुर्घटनेतील जखमींची रुग्णालयात जाऊन त्यांनी भेट घेतली. रुग्णांची विचारपूस करून शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्याच्या दृष्टीने योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

समृद्धी महामार्गाचे शहापूरजवळील सरलांबे येथे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री प्रिकास्ट केलेला कॉलम बसवताना ही दुर्घटना घडली. दुर्घटनास्थळी भेट देऊन मंगळवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आज पंतप्रधानांच्या पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे पुणे येथे होते. मात्र, दुर्घटनेचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या  कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा मा. मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, दुर्घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेतील जखमींना शहापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींच्या प्रकृतीत तातडीने सुधार होण्याच्या दृष्टीने योग्य ते सर्व उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करत शासन आपल्या पाठीशी असल्याचे सांगून त्यांना धीर दिला. तसेच दुर्घटनेबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे तातडीने सखोल चौकशी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यासमयी शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्यासह जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here