महसूल सप्ताहाच्या माध्यमातून विविध योजना सामन्यांपर्यंत पोहोचविणार- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

0
8

               अमरावती, दि. 1 : महसूल विभागातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना व्यापक प्रमाणात माहिती होऊन त्यांना लाभ घेता यावा, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. तसेच शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून ‘महसूल सप्ताहा’चे विभागात सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिली. या सप्ताहात सामान्य जनतेच्या हितासाठी महसूल विभागाव्दारे विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महसूल दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. पाण्डेय यांच्या हस्ते विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. उपायुक्त संजय पवार, विजय भाकरे, गजेंद्र बावने, अजय लहाने यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी  यावेळी उपस्थित होते.

            महसूल विभागामार्फत दिनांक 1 ते 7 ऑगष्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. अमरावती विभागात जिल्हास्तरावर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून जनतेला शासकीय योजनांचा लाभ पोहचविण्याच्यादृष्टिने विशेष नियोजन करण्यात आले आहे. दि. 1 ऑगष्ट हा ‘महसूल दिन म्हणून साजरा करण्यासह विभाग व जिल्हास्तरावर ‘महसूल सप्ताहा’ला आज रोजी प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत आज महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात करण्यात आला.

            शासनाचे महत्वाचे कायदे, विकास योजना, उपक्रम धोरणे याबाबतची संपूर्ण माहिती विविध प्रसारमाध्यमांव्दारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येणार असून या उपक्रमांतर्गंत तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मुलाखती, व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे.  विभागीय व जिल्हास्तरावर महसूल विभागांमार्फत देण्यात येणारे विविध दाखले आणि प्रमाणपत्रे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची माहिती तयार करुन नागरिकांना लाभ देण्याच्यादृष्टिने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल सप्ताहा निमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पाण्डेय यांनी केले आहे.

महसूल सप्ताहातील लोकाभिमुख उपक्रम :

             उपक्रमांतर्गत या सप्ताहात 2 ऑगष्ट रोजी राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 याबाबत संवाद व कार्यशाळा तसेच विविध दाखले वितरणासंबंधी माहिती दिली जाणार. 3 ऑगस्टला वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल. 4 ऑगस्टला आपले सरकार पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण, राज्य माहिती अधिकारी महसूल कायद्याबाबत व विशाख समितीबाबत मार्गदर्शन करतील. 5 ऑगस्टला माजी सैनिक, सैनिक यांच्या तक्रारींचे निवारण व सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या तक्रारींसंबंधी संवाद करतील. 6 ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कार्यासनामधील सहा गठ्ठे पध्दतीची पाहणी व अभिलेख कक्ष अद्यावतीकरण उपक्रम राबविल्या जाणार. 7 ऑगस्टला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाव्दारे सप्ताहाची सागंता होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

गौरव- सन्मानार्थी अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी :

 विभागस्तरीय (कंसात कार्यालयाचे नाव)

अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे (यवतमाळ जिल्हाधिकारी कार्या.), उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड (उमरखेड), तहसीलदार निखील धुळधर (वणी, जि.यवतमाळ), नायब तहसीलदार स्वप्नाली काळे (अकोला जिल्हाधिकारी कार्या.), निम्नश्रेणी लघुलेखक नितीनी लोणकर (मुर्तिजापूर उपविभागीय कार्या.), अव्वल कारकुन  गजानन उगले (जिल्हाधिकारी कार्या. वाशिम), महसूल सहायक श्रीमती उमा गावंडे (जिल्हाधिकारी का. अकोला), मंडळ अधिकारी एल. व्ही. देशपांडे (यवतमाळ तहसील), तलाठी राहुल वरघट (कारंजा), शिपाई अरविंद चक्रनारायण (वाशिम), वाहनचालक गजानन चौधरी (दिग्रस), पोलीस पाटील अंजली पाटील (घाटंजी),क कोतवाल विशाल राऊत (मेहकर)

विभागीय आयुक्त कार्यालयातील सन्मानार्थी अधिकारी-कर्मचारी :

           उप आयुक्त विजय भाकरे, सहायक आयुक्त गजानन सुरंजे, नायब तहसीलदार संजय मुरतकर, लघुलेखक संतोष मेश्राम, अव्वल कारकुन संतोष नटवे, प्रवीण वैद्य, राहुल जुमळे, महसूल सहायक सुरज पुनसे, पुरुषोत्तम काळे, वाहन चालक विजय भाकरे, शिपाई नंदु रामटेके, ममता सुर्यवंशी, संजय बोरे आदींचा उत्कृष्ट अधिकारी- कर्मचारी म्हणून विभागीय आयुक्तांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

            कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसीलदार वैशाली पाथरे यांनी तर आभार संतोष काकडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सहायक आयुक्त श्यामकांत मस्के, स्वीय सहायक अतुल लवणकर, नायब तहसीलदार मधुकर धुळे व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here