विधानसभा प्रश्नोत्तरे

0
7

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग जमीन संपादनाबाबत एसआयटीमार्फत चौकशी करणार  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 2 : पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादन करण्यात आली आहे. यामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

‘पालघर जिल्ह्यातील किराट गाव येथे मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी जमीन संपादित करताना झालेला गैरव्यवहार’ याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य मनीषा चौधरी, नाना पटोले, राजेश पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.

महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, या प्रक्रियेत अनेक विभागांचा सहभाग आहे. या चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात येतील आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

नवीन वाळू धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सुधारणा करणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 2 : राज्य शासनाने वाळू आणि गौण खनिजबाबतचे धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून काही सूचना असतील तर त्याचा अभ्यास करून धोरणामध्ये आवश्यक सुधारणा केली जाईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

रायगड जिल्ह्यातील कुंडेवहाळ येथून मुंबईतील विकास कामाकरिता वाळू व खडीचा पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून होत असलेला गैरव्यवहार याबाबतचा प्रश्न सदस्य प्रशांत बंब यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, जे प्रमाण ठरले आहे त्यानुसार वाळूचा वापर होत आहे. अनेक ठिकाणी वाळू डेपो सुरू केले आहेत. अधिकाधिक डेपो सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच या पोर्टलमधील त्रुटी दूर करण्याचे कामही सुरू आहे.यात घरकुलांना प्राधान्य देण्यात येत आहे. शासकीय क्रश सँण्ड वापरण्याचे धोरण आणण्याचा विचार आहे, असेही महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

सदस्य बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, हरिभाऊ बागडे, नाना पटोले, अशोक चव्हाण यांनी ही यावेळी प्रश्न उपस्थित केले होते.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

वनहक्क जमिनीवरील अतिक्रमणाबाबत विभागीय आयुक्तांकडून चौकशी करणार  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. २ : वनहक्क जमिनीवर भू-माफिया अतिक्रमण करून सपाटीकरण करत असल्याच्या तक्रारी विविध जिल्ह्यांमधून येत आहेत. याबाबत विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यातील मुरखळा शहराजवळील भागात शासनाने वाटप केलेल्या वनहक्क जमिनीवर भू-माफियांनी कब्जा केल्याबाबतचा प्रश्न सदस्य रोहित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, डॉ. देवराव होळी, यशोमती ठाकूर, संजय केळकर यांनी उपस्थित केला होता.

महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी, गडचिरोली करीत आहेत. परंतु, ज्या जिल्हात वन हक्क जमिनीबाबत अनियमितता झाली आहे किंवा भूमाफियांकडून वनहक्काचा गैरवापर केला जात आहे, अशा तक्रारी ज्या जिल्ह्यातून येत आहेत, तेथे त्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्तांना  देण्यात येतील. तसेच वन मंत्री यांच्या उपस्थित यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असेही महसूल मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

000

काशीबाई थोरात/विसंअ/

दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार – महसूल मंत्री विखे पाटील

 

मुंबई, दि. 2 : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीमध्ये  गैरव्यवहार प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत चौकशी समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीत होत असलेला गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुनील टिंगरे, राहुल कुल यांनी उपस्थित केला होता.

महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की, दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणी दस्तांच्या तपासणीबाबत कारवाई करण्यात येत आहे. दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ४ व हवेली क्रमांक ९ या कार्यालयामधील मागील एक वर्षातील दस्त नोंदणीची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने पुणे शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयामधील मे २०२३ आणि जून २०२३ या कालावधीमध्ये नोंदणी झालेल्या दस्तांची तपासणी करण्यासाठी ९ तपासणी पथके गठित केली असून सह जिल्हा निबंधक वर्ग -१ पुणे शहर यांनी पुणे शहरातील सह दुय्यम निबंधक यांच्या हवेली क्र. ४ व हवेली क्र. ९ कार्यालयामध्ये सन २०२० पासून नोंदणी झालेल्या दस्तांची तपासणी करण्याचे नियोजन केले. त्यानुसार तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान दस्तनोंदणीमध्ये अनियमितता आढळून आल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

00

काशीबाई थोरात/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here