सहकार विभागातील रिक्तपदांसाठी लवकरच
भरतीप्रक्रिया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.३ : राज्यातील सर्वच विभागातील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. सहकार विभागातील रिक्त पदे लवकर भरण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक यांना लाच घेताना अटक केल्याबाबतचा प्रश्न सदस्य लहू कानडे यांनी उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, या प्रकरणांमध्ये जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित आहे. सहकार विभागाचे काम अधिक गतीने आणि सुसूत्रतेत चालण्यासाठी ठरलेल्या मुदतीत सर्व पदे भरण्यात येतील. संपूर्ण पारदर्शीपणे भरती केली जात आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
काशीबाई थोरात/विसंअ/
०००
पिंपळदरी तलावाच्या दुरुस्तीसह सिंचनअनुशेषासाठी
निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंगोली जिल्ह्यातील औंढा – नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी तलावाच्या सांडवा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध आहे. या तलावाच्या दुरुस्तीसह हिंगोली जिल्ह्याचा सिंचनअनुशेष पूर्ण करण्याच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य संतोष बांगर यांनी पिंपळदरी येथील सांडव्याची दुरुस्ती करणेबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, माजी मालगुजारी तलाव, लघु पाटबंधारे तलावामधील गाळ काढण्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच माजी मालगुजारी तलावाच्या संवर्धनाचा कार्यक्रम आखण्यात येईल.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य अशोक चव्हाण, नाना पटोले, प्रकाश आबिटकर, तानाजी मुटकुळे यांनी सहभाग घेतला.
००००
शैलजा पाटील/विसंअ/
हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच
करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. पुणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण लक्षात येऊन हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथे महापारेषण कंपनीने बांधलेले ४०० केव्हीचे सबस्टेशन बंद असल्याबाबतचा प्रश्न सदस्य राहुल कुल यांनी उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हे उपकेंद्र बंद नाही. ४०० के. व्ही. सह आणखी सहा अतिउच्चदाब उपकेंद्र बँक चार्ज करण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश उपकेंद्र त्यांच्या संलग्न वाहिन्या वनविभागाच्या मंजुरी अभावी कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. तसेच 66 के.व्ही. पेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्याच्या व्याप्त जागेचा तसेच अतिउच्च दाब पारेषण वाहिन्याच्या पट्ट्याखालील जमिनीच्या नुकसान भरपाई पोटी मोबदला देण्यासंदर्भात धोरण निश्चित केले आहे. या सुधारित धोरणानुसार बाधित शेतकरी, जमीनधारकांना वाढीव मोबदला देण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
काशीबाई थोरात/विसंअ/
000
खुतमापूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी नुकसान
भरपाई देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील खुतमापुर येथे विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य जितेश अंतापूरकर, अशोक चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना प्रथम आर्थिक मदत म्हणून 20 हजार रुपये मदत देण्यात आली आहे. या कुटुंबीयांनी वारसाहक्क प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उर्वरित नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्यात येईल. तसेच या अपघात प्रकरणी विद्युत निरीक्षक नांदेड यांनी घटनास्थळी पाहणी करून अपघात प्रकरणी महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार संबंधितांना निलंबित करण्यात आले आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
000
आरे वसाहतीतील मूलभूत सुविधाबाबत महानगरपालिका आयुक्तांसोबत
बैठक घेणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
गोरेगाव येथील आरे वसाहतीच्या विकासासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येणार आहे. या वसाहतीतील मूलभूत सोयी सुविधाबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य रवींद्र वायकर यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान आरे वसाहतीतील रस्ते देखभाल, पथदिवे, वैद्यकीय सुविधा याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, आरे वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. येथील अतिक्रमणाबाबत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मागील काही दिवसात आरेमध्ये तीनशेपेक्षा जास्त पथदिवे बसविण्यात आले आहेत. आरेमधील रहिवाशांना पाणी, रस्ते, आरोग्य, वीज अशा मूलभूत सोयीसुविधा तत्काळ पुरवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. आरेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने गठित केलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत योगेश सागर यांनी सहभाग घेतला.
०००
शैलजा पाटील/विसंअ/
वाहन चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करणार – मंत्री दादाजी भुसे
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान समृद्धी महामार्गावरील होणारे अपघात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या महामार्गावर दररोज किमान १७ ते १८ हजार वाहने प्रवास करतात. भविष्यात या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सर्व वाहनांना १२० किलोमीटर प्रती तास इतकी वेगमर्यादा घालण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता तसेच अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. अपघात होऊ नये यादृष्टीने परिवहन विभागातर्फे वाहन चालकांचे वेळोवेळी समुपदेशन केले जाते. वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आवश्यक दिशादर्शक चिन्हे, सूचना फलके, माहिती फलके, वेगमर्यादा दर्शक फलके लावणे, लेन मार्किंग करणे, उपाययोजना केलेल्या आहेत, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरिभाऊ बागडे, सुनील केदार यांनी सहभाग घेतला.
०००
शैलजा पाटील/विसंअ/