विधानपरिषद प्रश्नोत्तरे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीर्थक्षेत्र

विकास योजना विचाराधीन  मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. ३ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मंदीरांप्रती मोठी आस्था होती. त्यांचे यामधील काम मोठे आहे. त्यांनी मंदीरांचे संवर्धन करून पायाभूत सोयीसुविधा उभारल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने वेगळी योजना करून ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राला 5 कोटी रूपयापर्यंत, ‘क’ वर्गाला 2 कोटी रूपयापर्यंत मदत करण्यासाठी शासन गांभीर्याने विचार करीत आहे, अशी महिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

निमखेड, ता. खेड जि. पुणे येथील खंडोबा देवस्थान रस्ता व नदीजवळ काँक्रिटची संरक्षण भिंतबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी सदस्य सुरेश धस यांच्यावतीने उपस्थित केला.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, निमखेड ता. खेड जि. पुणे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान हे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र आहे. ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येतो. त्यानुसार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून या तीर्थक्षेत्रातील रस्ता व काँक्रिटच्या संरक्षण भिंतीसाठी मागणी केलेल्या निधीची महिनाभरात तरतूद करण्यात येईल. पाली येथे अष्टविनायक गणपतीपैकी एक मंदिर असून भाविकांची मोठी गर्दी येथे होत असते. पाली येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी मागणीनुसार नियमात व निकषात बसेल त्यानुसार निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. यासाठी 7 दिवसांमध्ये बैठकही घेण्यात येईल.

नाशिक – मुंबई रस्त्यावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ‘बारव’च्या संवर्धनाबाबत माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल. कोथळी ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे संत मुक्ताबाई यांचे मंदिर आहे. तीर्थक्षेत्र विकास कामासाठी कोथळी येथे निधीची तरतूद केलेली आहे. येथील कामे तातडीने सुरू करण्यात येतील.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सूचना देताना म्हणाल्या की, लोकप्रतिनिधी मंदिरात दर्शनाला जातात. अशा वेळी लोकप्रतिनिधींना तेथील अपूर्ण कामे, समस्या, विकास कामांची गरज लक्षात येते. याबाबत पुरातत्व विभागाच्या सूचनांना बाधा न येता एक निवेदन संबंधित मंत्री महोदयांना देण्यात यावे, जेणेकरून तेथील विकासकामे करता येतील.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीर, जयंत पाटील, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

निलेश तायडे/विसंअ/

000

पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यास प्राधान्य देणार

– पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यासाठी शासनाला शक्य आहे, तिथे प्राधान्याने मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत दिले.

सदस्य रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत सोलापूर जिल्ह्याला दिलेले ७५ हजार नळ जोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत तसेच राज्यात सौर ऊर्जेवर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात  ५ लाख ७६ हजार ०७८ नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. सन २०२३ अखेर प्रगतिपथावरील ८५५ पाणीपुरवठा योजनांमधील नळजोडण्या देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २४ नळयोजना सौर ऊर्जा प्रकल्पावर कार्यरत आहेत. नव्याने अशी काही मागणी आल्यास त्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर, नरेंद्र दराडे, महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

मानसिक आरोग्य कार्यक्रमाची प्रभावी

अंमलबजावणी – आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्यसेवा देण्यात येतात.  तसेच या रुग्णांसाठी १० खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील मनोविकृती विशेषज्ञांची रिक्त पद भरतीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील मनोरुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत सदस्य श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते.

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व तांत्रिक मार्गदर्शनासाठी विविध योजना राबविण्यात येतात. प्रादेशिक रुग्णालय, पुणे येथे २ हजार ५४० खाटांचे रुग्णालय आहे. ठाणे येथे १८५० खाटांचे रुग्णालय आहे नागपूर येथे. ९४० खाटांचे रुग्णालय आहे. रत्नागिरी येथे 365 खाटांचे रुग्णालय आहे. कोल्हापूर आणि जालना येथे ३६५ खाटांचे रुग्णालयाची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात येते. राज्यात मनोविकृतीशास्त्र विभाग आहे. यामध्ये 14 वैद्यकीय रुग्णालये आहेत. त्यांच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रेरणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मनशक्ती क्लिनिकदेखील सुरू करण्यात आलेले आहेत. १४७० प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत मानसिक आरोग्याबाबत सेवा देण्यात येतात. ‘टेलिमानस’ हा उपक्रम देखील राबविण्यात येत आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे, असेही मंत्री डॉ.सावंत यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अॅड. अनिल परबनिरंजन डावखरेअभिजीत वंजारीसतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

****

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चौकशीसाठी

समिती गठित करणार – प्रा. डॉ. तानाजी सावंत

बेलोरा (बु.) ता. पुसद, जि. यवतमाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाल्याबाबत पुढील चार दिवसात समिती गठित करून वस्तूनिष्ठ चौकशी अहवाल मागविण्यात येईल. तेथील वास्तवदर्शी परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येईल. चौकशी अहवालानंतर अर्थसंकल्पीय तरतूद करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

बेलोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरावस्थेबाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री प्रा. सावंत म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यात 13 ग्रामीण रुग्णालये, 4 उपजिल्हा रुग्णालये,   1 स्त्री रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र 67 आणि उपकेंद्र 446 आहेत. बेलोरापासून अनसिंग ग्रामीण रूग्णालय 20 व महागाव ग्रामीण रुग्णालय 14 किलोमीटर, पुसद उपजिल्हा रुग्णालय, हिंगोली जिल्हा रुग्णालय व वाशीम जिल्हा रुग्णालय 35 किलोमीटरवर आहे. बेलोरा येथे आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. मात्र सद्य:परिस्थितीचा विचार करता येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतरणासाठी बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल.  तसेच दूरवस्थेबाबत समिती गठित करून वस्तुनिष्ठ अहवाल घेण्यात येईल.

बीड जिल्ह्यातील ‘क’ व ‘ड’ संवर्गातील कंत्राटी कर्मचारी भरती प्रक्रिया ब्लॅक लीस्ट कंपनीकडून करण्यात येत असल्याची बाब लोकप्रतिनिधींनह निदर्शनास आणली आहे.  या भरती प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकांबाबतचा अहवाल उपसंचालकांच्या माध्यमातून मागविण्यात आला आहे. बीड येथील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दोन विभागीय चौकशी सुरू आहेत. लोकप्रतिनिधींच्या भावना व बीड जिल्ह्यातील हे प्रकरण पाहता बीड जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्याची घोषणा एका उपप्रश्नाच्या उत्तरादरम्यान आरोग्य मंत्री प्रा. सावंत यांनी केली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री वजाहत मिर्झा, जयंत पाटील, निलय नाईक यांनी सहभाग घेतला.

निलेश तायडे/विसंअ/

 

000

 

कोल्हापूरला वायुदलाच्या अभ्यासक्रमासाठी

शासन सकारात्मक – मंत्री संजय बनसोडे

 

कोल्हापूर येथे राष्ट्रीय छात्रसेनेचे (एनसीसी) मुख्यालय आहे. या ठिकाणी सैन्यदल व नौदलाचा अभ्यासक्रम शिकविला जातो. तेथे  विद्यार्थ्यांसाठी वायुदल (एअर फोर्स) अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यास शासन सकारात्मक आहे. एनसीसीच्या वायुदल शाखा जागा मिळण्यासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, कोल्हापूर येथे वायुदल शाखेच्या जागेसाठी नवी दिल्ली येथे केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे जाऊन  पाठपुरावा करण्यात येईल, व लवकरात लवकर हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे फ्लाइंग क्लबसाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेंतर्गत एअर विंग अभ्यासक्रम शिकविण्यासाठी सूचना देण्यात येतील. वाशीम येथे राष्ट्रीय छात्रसेनेची बटालियन निर्माण करण्यासाठी व पथक वाढविण्यासाठी माहिती घेऊन सभागृहाच्या पटलावर ठेऊ, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, अरुण लाड, किरण सरनाईक यांनी सहभाग घेतला.

000

निलेश तायडे/विसंअ/