महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 8 : शेतकऱ्यांना लागणारी खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेल्या महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त तथा महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण, उपमहाव्यवस्थापक सुरेश सोनवणे, सुजित पाटील, ज्योती देवरे, महेंद्र बोरसे, महेंद्र धांडे, देवानंद दुथडे, गणेश पाटील यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले, महामंडळाची 13 विभागीय कार्यालये आणि 10 उत्पादन घटक कार्यरत आहेत. त्यामध्ये खत कारखाने, पशुखाद्य कारखाने, एम.आय.एल, कृषी अभियांत्रिकी कारखाना यांचा समावेश आहे. या कारखान्यांमध्ये उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल घटक केंद्र सरकारद्वारे नियंत्रित प्रमाणात वितरित केले जात आहे.

त्याचबरोबर महामंडळ आणि कृषी विभागाच्या अधिनस्त असलेल्या जागा विना वापर पडून असून काही ठिकाणी अतिक्रमण वाढत आहे. अशा जागांचा अभ्यास करून त्यावर शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यासाठी उपयोगी ठरणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने सुरू करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/