मुंबई, दि. 8 : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डोंगरी येथील उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट देवून पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.
बालकांचे समुपदेशन करताना भेटायला येणाऱ्या पालकांचे समुपदेशन करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. येथील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केल्या. यावेळी त्यांनी बालकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, अन्न धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी असणारी स्वच्छता तसेच बालकांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी पाहणी केली.
बालके, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. निरीक्षण व बालगृहातील मुलांच्या मानसिकता आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या उपचाराची मंत्री कु. तटकरे यांनी माहिती घेतली. तसेच कर्मचाऱ्यांच्याही समस्या जाणून घेवून त्या सोडवण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक बोलवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री कु. तटकरे यांनी डोंगरी येथील बालगृहाला अचानक भेट दिली. या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या इमारतीविषयी माहिती घेतली. पुढील 25 वर्षात येणाऱ्या बालकांची संख्या लक्षात घेवून इमारती बांधकामाचे नियोजन करावे. बालकांना नियमानुसार सोयीसुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.
यावेळी बालविकास उपायुक्त राहुल मोरे, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपआयुक्त बापूराव भवाने,मुंबई शहरच्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांची उपस्थिती होती.
0000