मुंबई, दि.12: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये 75 व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी दु. 12 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले, व्हर्च्युअल क्लासरूममध्ये इंटरॲक्टीव्ह पॅनल, संगणक सेवा, उत्तम बैठक व्यवस्था असणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्किल इंडिया’ व ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमातंर्गत राज्यातील सर्व 419 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाद्वारे 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे बळकटीकरण, 547 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना सहकार्य करण्यात येत आहे. या माध्यमातून राज्यात युवक व युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राज्यभर यशस्वीपणे राबविण्यात येईल.
या कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, रोजगार व नाविन्यता विभागाचे आयुक्त एन.रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी हे उपस्थित राहणार आहेत.
0000