प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.14 (जिमाका) : प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यास शासन कटिबद्ध असून प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्रशासनाने समजून घेवून, सोडविण्यासाठी  विशेष शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात विविध विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, तारळी प्रकल्पातील पात्र 81 प्रकल्पग्रस्तांना भूखंड उपलब्ध असून वाटपासंदर्भात प्रांताधिकारी कराड यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन कार्यवाही करावी. पुनर्वसीत गावठाणांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नागरी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.  तसेच त्यांची जमिन मोजणी करुन घ्यावे व त्यांना त्यांच्या जागेचा नकाशा लवकरात लवकर द्यावा.

मुख्यमंत्री महोदयांनी भूमिपूजन केलेल्या कामांचा आढावा

        पाटण विधानसभा मतदार संघात शासनाच्या विविध योजनांमधून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा माहे जून मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भूमिपूजन कामांचाही आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. सध्या पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व कामे सुरु करावीत. कामे करत असताना त्यांची गुणवत्ताही राखावी. तसेच झालेल्या कामांची छायाचित्रे अपलोड करावीत. तसेच टंचाईला सामोरे जावे लागू नये अशा पद्धतीने जल जीवन मिशनची कामे कालबद्ध वेळेत पूर्ण करावीत.

            कांदाटी खोऱ्यातील 105 गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला दरवर्षी सामोरे जावे लागते. कायम स्वरुपी हा प्रश्न मिटावा यासाठी  जल जीवन मिशनच्या माध्यमातून साठवण क्षमता निर्माण करावी. पाऊस कमी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांमध्ये भेटी देवून वस्तुनिष्ठ पर्याय उभे करावेत.  या भागात अतिवृष्टी होत असल्याने येथे नागरी सुविधा पुरवित असताना दीर्घकाळ टीकतील, असे रस्ते तयार करावेत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

0000