प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि गतिमान होण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली उपयुक्त ठरेल-क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

0
24

लातूर दि. 15 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा वापर होणार असल्याने या कार्यालयातील प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होईल, असा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-ऑफिस प्रणालीचे उद्घाटनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ई-ऑफिस प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज गतिमान होवून विविध प्रकरणांचा निपटारा तातडीने होईल. ग्रामपंचायत स्तरावरही ई-प्रणाली कार्यान्वित केल्यास ग्रामस्तरावरील प्रशासन गतिमान होईल. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना ना. बनसोडे यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी प्रास्ताविकामध्ये ई-ऑफिस प्रणालीच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली. लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत तयार करण्यात आलेल्या ‘वीज कोसळणे : कारण, नुकसान व सुरक्षितता’ या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. वीज कधी, कुठे आणि कशी कोसळते हे जाणून घेवून, त्यापासून स्वसंरक्षण कसे करावे आणि वीज कोसळल्यास बाधित व्यक्तीला मदत करून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

००००