कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ

0
9

नाशिक, दिनांक: 21 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त) : नाशिकच्या गंगापूर गाव परिसरात साकारत असलेल्या कलाग्रामच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादनास विक्रीसाठी हक्काचे स्टॉल्स उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज पंचायत समिती नाशिकच्या आवारात आयोजित उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रानभाज्या महोत्सव व राखी महोत्सवास दिलेल्या भेटीप्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, पंचायत समिती गट विकास अधिकारी सोनिया नाकाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, कलाग्रामसाठी सुमारे ८ कोटी रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून या कालाग्राम मध्ये कायमस्वरूपी १०० स्टॉल्स उभारले जाणार आहेत. येत्या दोन  ते तीन महिन्यात कलाग्रामचे काम पूर्ण केले जाणार असून ते स्वयंसाह्य बचतगट, महिला बचतगट , आदिवासी महिला उद्योजक यांच्यासाठी माफक दरात खुले केले जाणार आहे. तसेच येवल्याच्या पैठणी केंद्रात देखील हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, रानभाजी महोत्सवातून जनसामान्यांना रानभाज्यांची आवड निर्माण करण्याचा चांगला प्रयत्न उमेदच्या माध्यमातून होत आहे.  येथील प्रदर्शनात तृणधान्यांपासून बनविलेले विविध खाद्य पदार्थ, सेंद्रीय खतातून पिकविलेल्या भाज्या, रानभाज्या, पानवेलींपासून बनविलेल्या बहुपयोगी कलाकुसरीच्या वस्तू, वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्या ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तू अस्सल व कमी खर्चात बनविलेल्या आहेत. तसेच Goda valley kart या पोर्टलच्या माध्यमातून या वस्तूंना ऑनलाईन मार्केट उपलब्ध होत आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

निसर्गाच्या सानिध्यात पिकलेल्या रानभाज्यांचे औषधी  गुणधर्म आणि  त्यांचा आहारातील समावेश आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. त्यामुळे नागरिकांनी या महोत्सवास भेट देवून आरोग्यवर्धक रानभाज्या व वस्तू खरेदी कराव्यात त्यासोबतच रानभाज्या बनविण्याची पाककृती सुद्धा जाणून घ्यावी असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

रानभाजी महोत्सवातील स्टॉल्सला मंत्री  छगन भुजबळ यांनी यावेळी भेट दिली. या महोत्सवात  सुरू करण्यात आलेले TATVA (तत्व)  ब्रँण्ड, Bonding Stories ब्रॅण्ड आणि Goda valley kart या पोर्टल यांच्या माहितीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. सीआयएफ फंडातून उन्नती बचतगट, त्र्यंबकेश्वर व सावित्रीबाई फुले बचतगट, पेठ यांना मायक्रोवेव्ह ओव्हन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here