दरवर्षी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याला आजूपासून सुरुवात झाली आहे. 8 सप्टेंबर हा पंधरवडा साजरा होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. नेत्रदानाबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी देश व राज्य पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या नेत्रदान पंधरवड्याविषयी हा विशेष लेख…
लहानपणापासून आपण पाप- पुण्य व दान-धर्माविषयी गोष्टी ऐकत आलो आहोत. पुर्वीच्या काळी पैशाचे दान, अन्नदान, वस्त्रदान याप्रमाणे प्रत्येकजण दान करत असत. दान करणे ही आपली संस्कृती पूर्वीपासून चालत आली आहे. आजच्या आधुनिक युगात दानाच्या व्याख्या थोड्या विस्तृत झाल्या आहेत. यामध्ये माणसाच्या शारीरिक व्यंगावर मात करण्यासाठी किंवा त्यांची शारीरिक व्याधी कमी करण्यासाठी दान केले जाते. या प्रकारच्या दानात नेत्रदान हेच श्रेष्ठदान हा एक मोठा विचार प्रचारात आला आहे. यामुळे काही कारणास्तव आंधळे झालेल्या व्यक्तींना दृष्टी सुख मिळाल्यामुळे त्यानां जीवनाचा एक नवीन मार्ग सापडला आहे. माणसाने केलेल्या नेत्रदानामुळे दृष्टी देण्याच्या प्रयोग यशस्वी झाला व जग बघण्याचे सुख त्यांना प्राप्त झाले आहे.
नेत्रदान म्हणजे काय ?
मृत्युनंतर आपले डोळे दान करण्याचा संकल्प करणे व मृत्युनंतर आपल्या नातेवाईकांकडून तो पूर्ण करून घेणे या प्रक्रियेला नेत्रदान म्हणतात.
नेत्रदान कोण करु शकतो ?
वय, जात, लिंग वा रक्तगट या बाबी नेत्रदानाच्या आड येत नाहीत. फक्त डोळ्यातील पारदर्शक बुब्बुळ निर्दोष करणे आवश्यक आहे. नेत्रदान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना चष्मा असेल. मोतियाबिंदू, काचबिंदु तिरळेपणा इ. दृष्टीदोषावर शस्त्रक्रिया केलेली असेल, तरीही त्या व्यक्ती नेत्रदान करु शकतात.
दान केलेले नेत्र कशाप्रकारे वापरले जातात ?
मृत्युनंतर शक्य तितक्या लवकर डोळे काढणे आवश्यक असते. जास्तीत- जास्त ४ ते ६ तासांच्या अवधीत डोळे काढावे लागतात. त्यानंतर ते एका बर्फाच्या खास पेटीत किंवा रोगप्रतिबंधक द्रव्यात (एम.के. मीडिया) मध्ये बुडवून नेत्रपेढीत नेले जातात, त्यानंतर जास्ती जास्त ४८ तासात त्याचे प्रत्यारोपण दुसऱ्या रुग्णावर केले जाते.
व्यक्तीच्या मृत्युनंतर डोळे दान करण्यासाठी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे ?
ताबडतोब जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधून तेथील अधिकाऱ्यांना मृत्युची वेळ, कारण व ठिकाण (घरचा पत्ता) याबाबत सविस्तर माहिती द्यावी. मृत व्यक्तीच्या डोक्याखाली उशी ठेवून डोके शरीरापेक्षा ६ इंच वर ठेवावे, मृत व्यक्तीचे डोळे उघडे असतील तर ते बंद करावे. त्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून त्या सुकणार नाहीत याची काळजी घ्यावी. खोलीतील पंखे संपूर्ण बंद करावे, ए.सी. असल्यास सुरू असू द्यावा.
डोळे काढल्यानंतर चेहरा विद्रुप होतो का ?
या प्रक्रियेत डोळे अंत्यत काळजीपूर्वक काढले जातात व मोठ्या कौशल्याने बंद करण्यात येतात. यामूळे व्यक्तीचा चेहरा विद्रुप होत नाही.
देशात अजूनही गरजेएवढे नेत्रदान केल्या जात नाही. जर नेत्रदानाबाबत कायदेशीर मान्यता देण्यात आली. तर नेत्रदानाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते व त्यामुळे बऱ्याच दृष्टीहिनांना दृष्टी मिळू शकते. डोळा ही मानवाला दिलेली अनमोल ठेव आहे. अत्यंत दुर्लभ अशा काही गोष्टी मानवाला जन्मजात बहाल केल्या आहे, त्यापैकी एक म्हणजे दृष्टी… डोळयाशिवाय जगण्याची आपण कल्पणाच करू शकत नाही. परंतु काही अभागी व्यक्ती विविध कारणांमुळे या सुखापासून वंचित राहतात व त्यांचे जीवन अंधकारमय होते. अशा व्यक्तींचे जीवन आपण प्रकाशाने उजळू शकतो. याकरिता राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती नागपूर अंतर्गत सर्व नागरिकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. वि. राठोड यांनी केले आहे.