सातारा दि.27 (जिमाका) : कारगिल युध्दात शहिद झालेले गजानन मोरे यांच्या अर्ध पुतळयास पुषचक्र अर्पण करुन राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अभिवादन केले.
भुडकेवाडी ता. पाटण येथे शहिद जवान गजानन मोरे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसीलदार रमेश पाटील, वीरमाता चतुराबाई यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कारगिल युध्दात शहिद झालेले गजानन मोरे यांचे बलिदान कायम स्मरणात ठेवले पाहीजे. देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या शहिद गजानन मोरे यांच्या कुटुंबासाठी सातारा शहरातील जागेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर शासनाकडे सादर करावा. विशेष बाब म्हणून या प्रस्तावास मंजुरी दिली जाईल.
मोरे कुटुंबीयांना परिसरातील नागरिकांनी आधार देवून एक प्रकारे दिलासा दिला आहे. हे प्रत्येकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. आपले जवान सीमांचे रक्षण करीत असल्यामुळे आपण सुरक्षीत आहोत. मोरे कुटुंबीयांच्या पाठीशी शासन असल्याचेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
000