नवी दिल्ली, २७ : केंद्र सरकारकडून यावर्षीचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ यादी जाहिर झाली असून, राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना पाच सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही देशातील शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने 5 सप्टेंबर रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. श्रीमती मृणाल गांजाळे या जिल्हा परिषद समीक्षा शाळा गाव महाळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी राज्य शिक्षक पुरस्कार आणि आयसीटी अवॉर्डही मिळालेला आहे.
शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कांचे वितरण केले जाते. यंदा मंत्रालयाकडून ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
000