वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुक्त विद्यापीठाने पुढाकार घ्यावा –  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १ : ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीदवाक्य असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शाळा सोडली आहे त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश आणि नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असे नवीन अभ्यास केंद्र तयार करायचा प्रस्ताव तयार करावा आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या शैक्षणिक अडचणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, उच्च शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन अभ्यास केंद्र तयार करता येतील का याबाबतचा प्रस्ताव मुक्त विद्यापीठाने तयार करून संबंधित विभागाला पाठवावा. त्यामुळे जी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल  आणि त्यांना पुढील उच्च शिक्षण घेता येईल.

तसेच उच्च  शिक्षणामध्ये व्यवसायिक उपयोजित व कौशल्याधिष्टीत शिक्षणक्रमांचे जिल्हा केंद्रावर आयोजन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करावेत, अशा सूचनाही  मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत शैक्षणिक सुविधा, जिल्हा केंद्र समन्वयक, जिल्हा केंद्रप्रमुख मानधन, शैक्षणिक गुणवत्ता वाढ करणे, आरोग्यमित्र, रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ