विकास कामातून प्राप्त झालेल्या सोयी सुविधांचे नागरिकांनी संवर्धन करावे  -मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि. (जिमाका): नागरिकांचे जीवन सुखकर होण्याच्या दृष्टीने विकास कामाच्या माध्यमातून अनेक आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सेवांचे नागरिकांनी संवर्धन करावे. असे आवाहन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. निफाड तालुक्यातील विंचूर आणि लासलगाव येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

निफाड तालुक्यातील विंचूर येथील विकास कामांचे भूमिपूजन व लासलगाव येथील जेष्ठ नागरिक भवन याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे व ग्रीन जीमच्या लोकार्पणप्रसंगी मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी सरपंच सचिन दरेकर, सरपंच बाळासाहेब पुंड, सरपंच अशोक नागरे, सरपंच विनोदराव जोशी, उपसरपंच कुमारशेठ चव्हाण, आत्माराम दरेकर, राजाभाऊ दरेकर, सदस्य शोभा बोराडे, पांडुरंग राऊत, इस्माईल मोमीन, बारकू व्यवहारे, विजेंद्र निकाळे, प्रीतम निकाळे, सागर बोराडे, सुनील बागले, गणेश बोराडे, राहुल विस्ते, आकाश नारायणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. लासलगाव येथील कार्यक्रमास सरपंच जयदत्त होळकर, अशोक होळकर, पुष्पाताई दरेकर, रामनाथ शेजवळ, वेदिका होळकर, सुरेखा नागरे, डॉ.श्रीकांत आवारे, मंगेश गवळी यांच्यासह पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, रस्ते, वीज, पाणी यासोबतच सभागृह, अभ्यासिका, व्यायामशाळा यासारख्या अनुषंगिक व आवश्यक सुविधा उपलब्ध करून  देण्यात आल्या आहेत. या सोयी सुविधांचे व वास्तूंचे संवर्धन करणे हे नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे. विकास कामांच्या भूमीपूजनासोबतच त्वरीत या कामांना सुरुवात देखील केली जाणार आहे. भविष्यातही ग्रामस्थ व नागरिक यांच्या गरजा लक्षात घेवून त्यादृष्टीने कामांची आखणी करण्यात येणार आहे. यासोबच २० कोटींच्या निधीतून १६ गाव पाणीपुरवठा योजनांचे काम झाले असून विंचूर व लासलगाव येथील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. या योजनेच्या इतर अनुषंगिक कामांसाठी अतिरिक्त ९ कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. परिणामी यातून विजेची बचत होवून वीजबील कमी येणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी कार्यकारणी कमिटी स्थापित केल्यास त्या कमिटीच्या माध्यमातून वेळोवळी उद्भणाऱ्या समस्यांचे निराकरण निश्चितच होईल, असेही मंत्री श्री. भुजबळ यांनी योवळी सांगितले.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले की, लासलगाव येथील लोकार्पण करण्यात आलेल्या ग्रीन जिमचा जेष्ठ नागरिकांसह महिला भगिनींनीही लाभ घेतला पाहिजे. आपले आरोग्य हीच आपली संपत्ती असून त्यासाठी दिवसभरातला थोडा वेळ देणे हे अत्यावश्यक आहे. लोकार्पण करण्यात आलेल्या ग्रीन जिमच्या इतर अनुषंगिक कामांसाठी आमदार निधीतून १० लाख रूपयांचा निधी मंत्री श्री. भुजबळ यांनी योवळी घोषित केला.

या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण

  • आंबेडकर वस्ती, विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक  आंबेडकर वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे कामाचे भूमिपूजन (रु.15 लक्ष)
  • सिद्धार्थ नगर येथे सामाजिक सभागृह बांधणे कामाचे भूमिपूजन (रु.15 लक्ष)
  • आण्णाभाऊ साठे नगर येथे सामाजिक सभागृह बांधणे कामाचे भूमिपूजन (रु.15 लक्ष)
  • लासलगांव, ता. निफाड येथील जेष्ठ नागरिक भवन याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे व जेष्ठ नागरिक भवन याठिकाणी ग्रिन जीम लोकार्पण

०००