कल्याणकारी योजना अंमलबजावणीत राज्यात जिल्ह्याचा आदर्श निर्माण करू – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार दि. २ (जिमाका): स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशाच्या आणि राज्याच्या सर्व महत्वाकांक्षी योजनांचा पथदर्शी जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे, त्याबरोबरच आता कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श राज्यासाठी निर्माण करू, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.

नवापूर येथे शबरी घरकुल योजनेच्या आदेश वाटप कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भरत गावित, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती संगिता गावित, नवापूर पं.स. सभापती बबिता वसावे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (नवापूर) चंद्रकांत पवार, गटविकास अधिकारी डी. एम. देवरे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, तसेच पदाधिकारी उपस्थित  होते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, येत्या दोन वर्षात केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना जिल्ह्यातील नागरिकांसाठी आहेत, त्या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थींना होण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. एकही नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही.

स्वच्छ पाणी, चकचकीत रस्ते, स्वमालकीचे घर, दर्जेदार शिक्षण, रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित शिक्षण, शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणतानाच प्रत्येक सामाजिक समुदायाला सर्व शासकीय योजनांचा लाभ, सोयीसुविधा देण्यासाठी सर्व पातळींवर प्रयत्न सुरू असून येत्या काळात राज्यातील विकासात आघाडीवर असलेल्या प्रथम तीन जिल्ह्यात नंदुरबार जिल्हा आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची  प्रतिमा लोककल्याणकारी, समृद्ध व सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून जगासमोर निर्माण झाली आहे, अशीच समृद्ध, सामर्थ्यवान प्रतिमा आपल्या जिल्ह्याची भविष्यात निर्माण करू.

यावेळी १ हजार ३१४ लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेच्या आदेशाचे वाटप करण्यात आले. प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी प्रास्ताविक केले.

दृष्टिक्षेपात शबरी घरकुल योजना

आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा-मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात, अशा अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थींना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण १२ हजार १९४ घरकुलांचे उदिष्ट देण्यात आले होते. त्यात नंदुरबार प्रकल्पसाठी ६ हजार ६३०  शबरी घरकुलांचे लक्ष्य प्राप्त झाले होते. ३ हजार ५८३ घरकुलांचे उदिष्ट साध्य झाले असून उर्वरित ३ हजार ४७ घरकुले पंचायत समिती नंदुरबार, नवापुर, शहादा यांचेकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांनुसार मंजूर केली जाणार आहेत.

०००